सर्व्हिंग: ४ ते ५ थालीपीठे
साहित्य:
१/२ कप साबुदाणा
२ उकडलेले मध्यम बटाटे
२ टेबलस्पून दाण्याचा कुट
१ टीस्पून लिंबूरस
१/२ टीस्पून जिरे
१/२ टीस्पून जिरेपूड
१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
२ हिरव्या मिरच्या चिरून
१/२ टीस्पून साखर
मीठ चवीप्रमाणे
तूप किंवा तेल
पूर्वतयारी: साबुदाणा ३-४ वेळा धुवून जितका साबुदाणा असेल त्याच लेव्हल इतके पाणी ठेवून रात्रभर भिजत ठेवा. बटाटे उकडून त्याची साले काढून ठेवा.
कृती:
१. बटाटे हाताने कुस्करून घ्या. त्यात भिजलेला साबुदाणा आणि बाकीचे सगळे साहित्य घालून हाताने एकत्र करून घ्या.
२. मिश्रणाचे २ ते २ १/२" चे गोळे करा.
३. तव्यावर १/२ टीस्पून वितळलेले तूप घाला. मिश्रणाचा गोळा त्यावर ठेवून तळव्याने दाब देत गोल आणि पात्तळ थालीपीठ थापून घ्या. थालीपीठाला सगळ्या बाजूनी आणखीन थोडे तूप सोडा. तवा गरम करा आणि वरून झाकण ठेवा. तवा गरम झाल्यावर २-३ मिनिटे थालीपीठ झाकण ठेवून वाफवून घ्या. नंतर झाकण काढा आणि थालीपीठच्या दोन्ही बाजू लालसर होईपर्यंत खरपूस भाजून घ्या.
४. गरम गरम थालीपिठाबरोबर लिंबाचे गोड लोणचे किंवा दही सर्व्ह करा.
५. ओल्या फडक्याने तवा पुसून पुन्हा पुढचे थालीपीठ थापून घ्या.
टीप:
१. थालीपीठात बटाट्याचे प्रमाण खूप जास्ती नसावे. साबुदाणा बांधून ठेवता येईल इतकाच बटाटा घालावा.
२. साबुदाणा भिजवताना खूप पाणी घालून भिजवत ठेवू नका.
३. बटाटा आणि साबुदाणा मिक्स करताना त्यात जास्तीचे पाणी उरले नाही आहे याची खात्री करून घ्यावी. पाणी असेल तर ते काढून टाकावे.
४. जमत असेल तर थालीपीठ प्लास्टिक शीटवर थापून तव्यावर टाकले तरी चालेल. प्लास्टिक शीटला तुपाचा हात लावू मग त्यावर थालीपीठ थापा. या पद्धतीमुळे कमी वेळात जास्ती थालीपीठे थापून होतात. आणि तवा आधीच गरम असल्यामुळे काम पटापट होते.
...hmmm maja ali
ReplyDelete