नारळाची वडी- Naralachya Vadya

सर्व्हिंग: २५ ते ३० वड्या 

मिश्रण शिजवण्यासाठी एकूण वेळ (
अंदाजे) : २० मिनिटे

साहित्य:
१ कप खवलेलं खोबरं (कपात खोबरं दाबून जितकं बसेल तितकं घेणे)
१ कप साखर
१/२ कप दुध
१/४ टीस्पून वेलची पावडर
१६" x ३२" प्लास्टिक शीट
लाटणं
१ टीस्पून तूप 


कृती:
१. मिक्सरवर खोबरं अगदी थोडसं फिरवून घ्या जास्ती वाटू नका म्हणजे वड्यांना छान टेक्स्चर येईल. खवलेल खोबरं न वाटता  तसच घातलं तरी चालतं. 
२. एका मोठ्या कढईत खवलेलं खोबरं,साखर आणि दुध एकत्र करून मध्यम आचेवर शिजवत ठेवा.
३. साखर वितळून मिश्रण घट्ट होईपर्यंत अधून मधून ढवळत रहा.
४. सुरवातीला साखर वितळेल आणि मिश्रणाला बुडबुडे यायला लागतील. जरा वेळानी दुध आटून मिश्रण घट्ट होऊन आळून येईल. मिश्रण आळून यायला लागलं कि, सतत परतत रहा.
५. एकीकडे जवळच्या सपाट पृष्ठ भागावर प्लास्टिक शीट अंथरा आणि त्याला टोकापर्यंत सगळीकडे तुपाचा हात लावून घ्या. मिश्रण तयार झालं कि अर्ध्या बाजूवरच मिश्रण घालून उरलेलं शीट आपल्याला त्यावर फोल्ड करायचे आहे.
६. हळू हळू मिश्रण घट्ट होऊ लागेल. त्यात वेलचीपूड घाला आणि परतत रहा.
७. थोड्यावेळानी कढईला लागलेलं मिश्रण कोरडं पडायला लागेल आणि मिश्रण आळून गोळा दिसायला लागेल याचा अर्थ मिश्रण तयार झाले. 
८. लगेचच गॅस बंद करा आणि भराभर भराभर मिश्रण अर्ध्या शीटवर ओता. उरलेली शीट त्यावर फोल्ड करून हातानी आणि लाटण्याचा वापर करून मिश्रण पसरवा आणि १/२"  जाडीचा मोठ्ठा चौकोन तयार करा.
९. फोल्ड केलेले शीट काढून गरम असतानाच  सुरिनी  हलक्या हातानी वड्या पाडा.
१०. २०-२५ मिनिटांनी गार झाल्यावर वड्या काढून सर्व्ह करा.

टिप्स:
१. मिश्रण जास्तीवेळ शिजले तर वड्या पडणार नाहीत  आणि गार झाल्यावर मिश्रणाचा चुरा होईल.
२. खोबर्‍यातला ब्राऊन भाग न घेता खवलेल्या खोबर्‍याचा जास्तीत जास्त पांढरा भाग घेण्याचा प्रयत्न करा.
३. वड्या करताना पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. छोट्याश्या चुकीने वड्या बिघडू शकतात.
४. वड्या गरम असतानाच पाडाव्या.
५. मिश्रण तयार आहे हे बघायचे असेल तर एक सोप्पी ट्रिक आहे थोडेसे गरम मिश्रण चमच्यात घ्या. एका बशीत गार पाणी घ्या आणि तो चमचा त्यात ठेवा. मिश्रण जर काही  सेकंदात सेट झाले तर मिश्रण तयार झाले आहे असे समजावे आणि सेट नाही झाले तर अजून काहीवेळ शिजवून पुन्हा याच पद्धतीने करून पाहावे.

1 comment:

  1. Hello,

    I have tried this recipe, but neat vadi tayaar ch nahi zala...
    vadi neat tayaar honyasathi kay karaav lagel??

    ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!