Showing posts with label गोड / Mithai. Show all posts
Showing posts with label गोड / Mithai. Show all posts

नारळाची वडी- Naralachya Vadya

सर्व्हिंग: २५ ते ३० वड्या 

मिश्रण शिजवण्यासाठी एकूण वेळ (
अंदाजे) : २० मिनिटे

साहित्य:
१ कप खवलेलं खोबरं (कपात खोबरं दाबून जितकं बसेल तितकं घेणे)
१ कप साखर
१/२ कप दुध
१/४ टीस्पून वेलची पावडर
१६" x ३२" प्लास्टिक शीट
लाटणं
१ टीस्पून तूप 


कृती:
१. मिक्सरवर खोबरं अगदी थोडसं फिरवून घ्या जास्ती वाटू नका म्हणजे वड्यांना छान टेक्स्चर येईल. खवलेल खोबरं न वाटता  तसच घातलं तरी चालतं. 
२. एका मोठ्या कढईत खवलेलं खोबरं,साखर आणि दुध एकत्र करून मध्यम आचेवर शिजवत ठेवा.
३. साखर वितळून मिश्रण घट्ट होईपर्यंत अधून मधून ढवळत रहा.
४. सुरवातीला साखर वितळेल आणि मिश्रणाला बुडबुडे यायला लागतील. जरा वेळानी दुध आटून मिश्रण घट्ट होऊन आळून येईल. मिश्रण आळून यायला लागलं कि, सतत परतत रहा.
५. एकीकडे जवळच्या सपाट पृष्ठ भागावर प्लास्टिक शीट अंथरा आणि त्याला टोकापर्यंत सगळीकडे तुपाचा हात लावून घ्या. मिश्रण तयार झालं कि अर्ध्या बाजूवरच मिश्रण घालून उरलेलं शीट आपल्याला त्यावर फोल्ड करायचे आहे.
६. हळू हळू मिश्रण घट्ट होऊ लागेल. त्यात वेलचीपूड घाला आणि परतत रहा.
७. थोड्यावेळानी कढईला लागलेलं मिश्रण कोरडं पडायला लागेल आणि मिश्रण आळून गोळा दिसायला लागेल याचा अर्थ मिश्रण तयार झाले. 
८. लगेचच गॅस बंद करा आणि भराभर भराभर मिश्रण अर्ध्या शीटवर ओता. उरलेली शीट त्यावर फोल्ड करून हातानी आणि लाटण्याचा वापर करून मिश्रण पसरवा आणि १/२"  जाडीचा मोठ्ठा चौकोन तयार करा.
९. फोल्ड केलेले शीट काढून गरम असतानाच  सुरिनी  हलक्या हातानी वड्या पाडा.
१०. २०-२५ मिनिटांनी गार झाल्यावर वड्या काढून सर्व्ह करा.

टिप्स:
१. मिश्रण जास्तीवेळ शिजले तर वड्या पडणार नाहीत  आणि गार झाल्यावर मिश्रणाचा चुरा होईल.
२. खोबर्‍यातला ब्राऊन भाग न घेता खवलेल्या खोबर्‍याचा जास्तीत जास्त पांढरा भाग घेण्याचा प्रयत्न करा.
३. वड्या करताना पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. छोट्याश्या चुकीने वड्या बिघडू शकतात.
४. वड्या गरम असतानाच पाडाव्या.
५. मिश्रण तयार आहे हे बघायचे असेल तर एक सोप्पी ट्रिक आहे थोडेसे गरम मिश्रण चमच्यात घ्या. एका बशीत गार पाणी घ्या आणि तो चमचा त्यात ठेवा. मिश्रण जर काही  सेकंदात सेट झाले तर मिश्रण तयार झाले आहे असे समजावे आणि सेट नाही झाले तर अजून काहीवेळ शिजवून पुन्हा याच पद्धतीने करून पाहावे.

गोड शिरा (सत्यनारायण प्रसाद)- God Shira

Read this recipe in English
सर्व्हिंग: ३ ते ४ माणसांसाठी 



साहित्य: 
१/२ कप बारीक रवा
१/४ कप पिकलेलं केळं, चिरून
१/२ कप साखर
 १ १/२ कप दुध
१/२ कप पाणी
१/२ कपापेक्षा किंचिंत कमी साजूक तूप
१ टीस्पून बदामाचे कप
२ टीस्पून बेदाणे
१/४ टीस्पून वेलचीपूड
चिमुटभर केशर

कृती:
१. कढईत तूप गरम करा. त्यात रवा घालून गोल्डन ब्राऊन होई पर्यंत भाजून घ्या.
२. रव्याचा  छान वास सुटला कि, त्यात केळं घाला आणि परता.
३. एकीकडे दुध आणि पाणी एकत्र करून उकळायला ठेवा.
४. रव्यात बदामाचे कप,बेदाणे,वेलची पूड आणि केशर घालून परता.
५. उकळते दुध-पाणी घाला आणि ५ मिनिटे झाकून ठेवा. रवा शिजून फुलून येईल.
६. गॅस बंद करा. त्यात साखर घालून नीट मिक्स करा. झाकण ठेवा. वाफेवर साखर विरघळली कि, थोड्यावेळानी शिरा सर्व्ह करा.

चॉकलेट वाँलनट ब्राउनी-Chewy Chocolate Brownie

Read this recipe in English
सर्व्हिंग:
१/२ किलो 



साहित्य: 
१ १/३ कप मैदा
३/४ कप कोको पावडर
१/२ टीस्पून बेकिंग पावडर
१/४ टीस्पून मीठ
२ अंडी १ टीस्पून व्हॅनीला इसेन्स

३/४ कप वितळलेल लोणी
१ २/३ कप साखर
२ टेबलस्पून पाणी
३/४ कप अक्रोडाचे तुकडे
आणि
१३" x ९" बेकिंग पॅन

कृती: 
१. साखर, लोणी आणि पाणी एकत्र करून चांगलं फेटून घ्या.
२. अंडी आणि व्हानीला इसेन्स एकत्र फेटून घ्या आणि लोणी-साखरेच्या मिश्रणात एकत्र करा आणि छान फेटून घ्या.

३. मैदा, कोको पावडर, मीठ आणि बेकिंग पावडर एका मोठ्या पातेल्यात बारीक चाळणीतून चाळून एकत्र करून घ्या आणि साखर आणि अंड्याच्या मिश्रणात मिक्स करा. सगळे मिश्रण एकाच दिशेने फिरवत छान फेटून घ्या.
४. त्यात अक्रोडाचे तुकडे घाला आणि एकत्र करून घ्या.
५. बेकिंग भांड्याला लोण्याचा हात लावून घ्या आणि वरती चिमटीने थोडासा मैदा भुरभुरा. मैदा भांड्याला चिकटला पाहिजे.जास्तीचा मैदा फुंकर मारून काढून टाका.
६. ओव्हन ३५० F तापमानाला प्रीहीट करा आणि १८ते २५ मिनिटे बेक करा. ब्राउनी मध्ये टूथ पिक टोचून बघा. टूथ पिक किंचित चिकट बाहेर आली याचा अर्थ ब्राउनी तयार झाली आहे.


बेसनाचे लाडू-Besan ke Laddu

सर्व्हिंग:  अंदाजे १२ लाडू

साहित्य:
२ कप बेसन
१/२ कप साजूक तूप (घट्ट)
१ कप पिठी साखर (टीप क्र.१ बघा)
१/४ टीस्पून वेलचीपूड (टीप क्र.२ बघा)
१ टेबलस्पून बदामाचे कप
१ टेबलस्पून बेदाणे

कृती:
१. कढईत तूप गरम करा. त्यात बेसन घालून व्यवस्थित मिक्स करा. बेसन आणि तुपाचे मिश्रण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खरपूस भाजून घ्या.बेसन भाजताना सतत लक्ष ध्या नाहीतर बेसन करपू शकते.
२. सुरवातीला भाजताना बेसन थोडं जड लागेल. परतायला त्रास होईल. सुरवातीला मिश्रण कोरडं वाटेल पण हळू हळू तुपामुळे मिश्रण किंचित पात्तळ दिसायला लागेल.साधारण ४०-४५ मिनिटे सतत भाजावं लागेल. गरज वाटल्यास वरून आणखीन चमचाभर तूप घाला. गोल्डन ब्राऊन रंग आला कि, बेसन आणि तुपाचे मिश्रण हलकं लागेल. किंचित  पात्तळ दिसेल आणि परतायला सोपं पडेल. याचा अर्थ बेसन व्यवस्थित भाजलं गेलं आहे.
३. गॅस बंद करा. ७-८ तास बेसन पूर्णपणे थंड होऊ द्या.
४. पिठी साखरेत वेलची पूड घालून एकत्र करा. बेसन पूर्ण थंड झाला कि त्यात बेदाणे,बदामाचे कप आणि पिठी साखर मिक्स करा. सगळं मिश्रण हाताने कालवून त्याचे लाडू वळा.
टीप:
१.पिठी साखर करण्यासाठी, साखर दळतानाच  त्यात वेलची घालून दळा.
२. दिलेल्या प्रमाणापेक्षा किंचित कमी साखर घाला. चव बघून मग गरज वाटली तर उरलेली साखर घाला.
३. बेसन व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर लाडू चवीला चांगले लागत नाहीत त्यामुळे बेसनाचे लाडू करताना बेसन छान गोल्डन ब्राऊन भाजणं खूप महत्वाचा असतं.

चॉकलेट केक- Chocolate Cake

सर्व्हिंग: ४ ते ६ माणसांसाठी

साहित्य:
२ कप मैदा
३/४ कप कोको पावडर
१ १/२ कप साखर
३/४ कप घट्ट लोणी
२ टीस्पून  बेकिंग पावडर
४ अंडी
१ टीस्पून व्हॅनीला इसेन्स  
१/२ कप गार दुध 
२ टेबलस्पून रेड वाईन + २ टेबलस्पून साखर-पाणी (optional)

कृती:
१. मैदा, कोको पावडर आणि बेकिंग पावडर एका मोठ्या पातेल्यात बारीक चाळणीतून चाळून एकत्र करून  घ्या.
२. साखर दळून बारीक करून घ्या. लोणी आणि साखर एकत्र करून छान फेटून घ्या. साखर पूर्ण विरघळून एकदम स्मूथ टेक्स्चर आले पाहिजे. अंडी वेगळी फेटून घ्या.


३. फेटलेल्या अंड्यात फेटलेलं लोणी-साखर घालून सगळे पुन्हा एकत्र फेटून घ्या. फेटताना एकाच दिशेने फेटा. सगळे मिश्रण एकजीव होऊन स्मूथ टेक्स्चर आले पाहिजे.


४. हे सगळे मिश्रण चाळून घेतलेल्या मैदा,कोको पावडर आणि बेकिंग पावडर मध्ये मिक्स करा. गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या. सगळे मिश्रण एकाच दिशेने फिरवत छान फेटून घ्या.


५. मिश्रण छान एकजीव झाले कि, त्यात दुध घालून पुन्हा फेटा.
६. व्हॅनीला इसेन्स  घालून मिक्स करा.
७. बेकिंग भांड्याला लोण्याचा हात लावून घ्या आणि वरती चिमटीने थोडासा मैदा भुरभुरा. मैदा भांड्याला चिकटला पाहिजे.जास्तीचा मैदा फुंकर मारून काढून टाका.

८. अलगदपणे तयार केलेले केकचे मिश्रण भांड्यात ओता. हाताने पसरून सपाट करून घ्या.

९. ओव्हन ३५० F तापमानाला प्रीहीट करा आणि ३० मिनिटे बेक करा. केक भांड्याच्या कडा सोडायला लागला याचा अर्थ केक पूर्ण बेक झाला. केकमध्ये टूथ पिक टोचून बघा. टूथ पिक स्वच्छ काहीही न चिकटता बाहेर आली याचा अर्थ केक झाला.

१०. केक पूर्ण थंड झाला कि, अलगद बाहेर कडा आणि केकला बरोबर मधून आडवी चीर द्या. कापलेल्या भागावर वाईन आणि साखरेचे पाणी स्प्रे करा किंवा शिंपडा.
११. कापलेले भाग पुन्हा एकमेकांवर ठेवून केकचे तुकडे करा आणि सर्व्ह करा.




दाण्याचा लाडू -Danyacha Ladoo

Servings: ४ लाडू

साहित्य:
१/२ कप दाण्याचा कुट
३ टेबलस्पून ओलं खोबरं
१/४ कप + २ टेबलस्पून किसलेला गुळ
१ टीस्पून तूप
१/२ टीस्पून किसलेलं आलं (आवडीप्रमाणे)

कृती:
१. सगळं साहित्य एकत्र करून हाताने कालवून घ्या.
२. चव बघून गोडी कमी वाटली तर आणखीन गुळ घाला. आणि मिश्रणाचे समान गोल लाडू वळा.
३. हे लाडू उपवासाला किंवा कधीतरी नुसते खायला चांगले लागतात.

टीप: लाडू लगेच वापरणार नसाल तर फ्रीज मध्ये ठेवावेत. बाहेर ठेवले तर ओलं खोबरं असल्यामुळे लाडू खराब होऊ शकतात.