Showing posts with label वडे / भजी /pakode. Show all posts
Showing posts with label वडे / भजी /pakode. Show all posts

मेथी मुठिया-Methi Muthia

सर्व्हिंग: अंदाजे २५ मुठिया  

साहित्य:
१ कप गव्हाचं पीठ
१ टेबलस्पून बेसन 
१/४ कप गव्हाचं जाडसर पीठ / रवा  
१ कप मेथीची पाने
३/४ कप दुधी भोपळ्याचा  कीस
१/४ कप गाजराचा कीस
१ १/२ टेबलस्पून आलं-लसूण हिरवी मिरचीची पेस्ट (२ मध्यम लसूण पाकळ्या+ १/२" आलं + १ हिरवी मिरची)
१/२ टेबलस्पून तीळ
मीठ चवीप्रमाणे
१ १/२ टीस्पून साखर
१/२ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१ १/२  टीस्पून धनेपूड
१ १/२  टीस्पून जिरेपूड 
२ टेबलस्पून थंड मोहन (तेल)
२ टेबलस्पून दही 
मुठिया तळण्यासाठी तेल

कृती:
१. दुधीचा कीस ,गाजराचा कीस एकत्र करा. त्यात मेथीची पाने चिरून घाला. त्यात मीठ,साखर,आलं- लसूण -मिरची पेस्ट ,तीळ घाला आणि सगळं कालवून घ्या.
२. बेसन आणि रवा घाला. मिश्रणात मावेल तितकं गव्हाचं पीठ घाला. २ टेबलस्पून मोहन घाला आणि दही घालून पीठ मळून घ्या.गरज लागल्यास आणखीन थोडेसे दही घाला पण थोडेसे सुद्धा पाणी घालू नका.
३. लगेचच पीठाचे १ १/२"- २" गोळे करा आणि त्याला लांबट आकार द्या.
४. तेल गरम करून मंद आचेवर मुठिया ब्राऊन रंग येई पर्यंत तळून घ्या.

टीप:
१. मुठिया तळण्याच्या आधी तेल तापले आहे याची खात्री करून मंद आचेवर तळून घ्या. तळण्याच्या आधी पिठाचा छोटासा गोळा तेलात टाकून बघा. पिठाचा गोळा हळू हळू तरंगत वर आला याचा अर्थ तेल तापले आहे
२. मेथीची पाने कमी असतील तर १/२ टीस्पून मेथीचे दाणे खमंग भाजून कुटून पिठात मिक्स करा त्यामुळे मुठियाला  खूप छान  स्वाद येईल.
३. दुधी आणि गाजराच्या किसात मीठ आणि मसाले मिक्स केले कि लगेचच पीठ घालून मळून घ्या. खूप वेळ ठेवले तर दुधीला पाणी सुटून पीठ चिकट आणि खूप सैल होईल. 

खेकडा भजी(कांदा भजी)-Kanda Bhaji

पाऊस म्हटलं कि आठवतो ओल्या मातीचा सुगंध, हवेतला गारठा, हिरवागार निसर्ग, क्वचित दिसणारे इंद्रधनुष्य, एखादं रोमँटिक गाणं
आणि आठवते कांदा भजी !
कांदा भजीची खरी आवड निर्माण झाली ती सिंहगडावर. कित्येकवेळा सिंहगडावर जायचं ठरलं कि, ए... आणि कांदा भजी पण खाऊया हे वाक्य ठरलेलं :-)
अशी हि सगळ्या महाराष्ट्राची आवडती कांदा भजी...


Read this recipe in English
सर्विंग:
८ ते १० भजी

साहित्य:
१ मोठा कांदा
१ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हळद
१/४ टीस्पून साखर
१/२ टीस्पून मीठ
१ टेबलस्पून तांदळाचं पीठ
कांद्यात मावेल तितके बेसन अंदाजे ३ टेबलस्पून बेसन
१ टीस्पून कडकडीत तेलाचे मोहन
तळण्यासाठी तेल









कृती:
१. कांदा उभा आणि पात्तळ चिरा.
२.त्यात मीठ - साखर,हळद तिखट ,बेसन आणि तांदळाचे पीठ घालून हाताने मिक्स करा.
३. कढईत तेल गरम करा. तेल चांगले तापले कि १ चमचा गरम तेल मिश्रणात घाला.गॅस बारीक करा.१ टेबलस्पून मापाने थोडे थोडे मिश्रण कढईत अंतरा-अंतरावर सोडा. मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत भजी तळा.
४. भजी बरोबर आवडीप्रमाणे लसणीची सुकी चटणी किंवा टोमॅटो केचप द्या.

टीप: कांद्यात मावेल इतकेच बेसन घाला. जास्ती बेसन घातले तर भजी आतून कच्ची राहील आणि कुरकुरीत होणार नाही 


इंदोर कचोरी-Indore Kachori

Read this recipe in English
सर्व्हिंग: १०-१२ कचो-या

साहित्य: 
कव्हरसाठी-
१/४ कप + २ टेबलस्पून मैदा
१/४ कप + २ टेबलस्पून गव्हाचं पीठ
१ १/२ टीस्पून बेसन
१ चिमुट साखर
१/२ टीस्पून मीठ
३ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन
सारणासाठी-
१/४ कप मुगाची डाळ ( १ तास भिजवत ठेवा.)
४ टेबलस्पून बेसन+ २ टीस्पून तूप
१ टीस्पून धने, १ टीस्पून जिरे, १ टीस्पून बडीशेप
३ टेबलस्पून सुकं खोबरं
१ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून आमचूर
३ ते ४ टीस्पून साखर
मीठ चवीप्रमाणे
फोडणीसाठी-१/४ टीस्पून मोहरी, १/४ टीस्पून हिंग, ६-७ कढीपत्ता पाने चिरून 
तळण्यासाठी तेल
सारण-
कृती: 
१. प्रथम सारणासाठी- भिजत घातलेली मुगाची डाळ मिक्सरवर कमीत कमी पाणी घालून बारीक वाटून घ्या.
२. कढईत सुकं खोबरं, धने,जिरे आणि बडीशेप एकत्र करून ब्राऊन रंग येई पर्यंत खरपूस भाजून घ्या. भाजून झाल्यावर हातानी चुरडून किंवा कुटून घ्या.
३. कढईत तूप गरम करा आणि त्यावर तांबूस रंग येई पर्यंत बेसन खमंग भाजून घ्या. बेसनाचा खमंग वास यायला लागला कि गॅस बंद करा.
४. भाजलेले बेसन आणि खोब-याचे मिश्रण एकत्र करा. त्यात लाल तिखट,आमचूर मीठ आणि साखर घाला.
५. पातेल्यात तेल गरम करा. तेल तापल्यावर मोहरी आणि कढीपत्ता याची फोडणी करा. हिंग घाला आणि लगेचच वाटलेली मुगाची डाळ घालून परता.डाळ कोरडी होई पर्यंत परतत रहा. डाळ कोरडी झाली कि खोबरे आणि बेसन मिक्स केलेलं मिश्रण घालून परता. ३-४ मिनिटे परता. सगळं जिन्नस छान एकत्र झालं पाहिजे. नंतर गॅस बंद करा. मिश्रण गार होऊ द्या.
६. कव्हरसाठी - गव्हाचं पीठ, मैदा मीठ आणि साखर हाताने एकत्र करून घ्या.कचोरी खुसखुशीत होण्यासाठी ३ टेबलस्पून तेल(मोहन) धूर येई पर्यंत कडकडीत गरम करा आणि पिठात ओता. चमच्याने तेल (मोहन) पिठात मिक्स करा.
७. गार पाण्याने पुरीला मळतो तितके घट्ट पीठ मळुन घ्या.(लाटताना चिकटणार नाही इतपत घट्ट) पीठ छान मुरण्यासाठी १ तास झाकून ठेवा.
८. पीठाचे १ " चे गोळे करा आणि पुरीच्या आकाराइतके ( ३" व्यास) आणि १ mm जाडीला  असेल असे लाटून घ्या. खूप पात्तळ किंवा खूप जाड लाटु नका. 
९. सारण मुठीत घेऊन दाबून त्याचा १ १/२" आकाराचा गोळा बनवा.पुरीच्या मध्यभागी सारणाचा गोळा ठेवा. आणि सगळ्या बाजूने गोळा झाकून बंद करून घ्या. किंचीतसेही सारण बाहेरून दिसत कामा नये. नाहीतर तळताना कचोरी फुटण्याची शक्यता असते.
१०. सारण पुरीने झाकल्यावर जास्तीचे पीठ काढून घ्या. तळव्याने कचोरी हलक्या हाताने दाबून थोडीशी चपटी करा.
११. कढईत तेल गरम करा. तेल चांगले तापले कि गॅस बारीक करा आणि मंद आचेवर गोल्डन ब्राऊन रंग येई पर्यंत कचो-या तळा.
१२. गरम गरम कचो-या चिंचेच्या चटणी बरोबर खायला द्या.

टीप:  
१.या कचो-या हवाबंद बरणीत ८-१० दिवस टिकतात. 
२.कव्हर मध्ये जास्तीजास्त सारण भरले गेले कि कचो-या भरीव आणि छान लागतात. कव्हरच्या गोळ्या पेक्षा  सारणाचा गोळा किंचित मोठा करा.
३. कचो-या तळण्याच्या आधी कव्हरचा छोटासा गोळा तेलात टाकून तेल व्यवस्थित तापले  आहे याची खात्री करा. कव्हरचा गोळा हळू हळू तरंगत वर आला याचा अर्थ तेल तापले आहे
४. मोठ्या आचेवर कचो-या तळल्या तर त्या कुरकुरीत होणार नाहीत.

वडा-पाव-Batata Vada Pav

Read this recipe in English
Servings : ६-७ वडे

साहित्य:
३-४ उकडलेले बटाटे  
२-३  लसूण पाकळ्या+ १/२" आलं +१ हिरवी  मिरची - यांची  पेस्ट  
२ टेबलस्पून कोथिंबीर
४-५  कढीपत्ता पाने
१/४  टीस्पून मोहरी  
१/४  टीस्पून हळद
१ टेबलस्पून तेल
मीठ चवीप्रमाणे  
लादी पाव
वड्याच्या कव्हरसाठी-
३/४ कप बेसन
१/२ कप ते ३/४ कप पाणी
१/४ टीस्पून हळद
मीठ चवीप्रमाणे


कृती:
१. उकडलेले बटाटे सोलून हाताने कुस्करून घ्या. त्यात आलं-लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट,मीठ आणि कोथिंबीर बारीक चिरून घाला.हाताने छान कालवून घ्या. चव बघून मीठ -मिरचीचे प्रमाण वाढवा.
२. फोडणीच्या कढईत  तेल गरम करा. तेल कडकडीत तापले कि त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली कि, कढीपत्ता पाने, हळद आणि हिंग घालून कुस्करलेल्या बटाट्याला फोडणी द्या. हाताने, फोडणी पूर्ण सारणात मिक्स करा आणि त्याचे समान ६-७ (अंदाजे २ १/२"- ३" व्यासाचे)  गोळे करा.
३. वड्याच्या कव्हर साठी-  ३/४ कप बेसन घ्या. त्यात हळद,मीठ आणि बेताचे पाणी घालून एकजीव करा. बॅटर जास्ती पात्तळ किंवा खूप जाड नको.चमच्याने वरून खाली टाकून बघा. तार यायला पाहिजे. साधारण १/२ कप -३/४ कप पाणी घालून बघा. लागल्यास आणखीन पाणी घाला. बॅटर मध्ये १ चमचा कडकडीत तेलाचे मोहन घाला म्हणजे कव्हर कुरकुरीत होईल.
४. वडे तळण्यासाठी कढईत पुरेसे तेल घ्या. तेल तापले कि बॅटरमध्ये सारणाचा गोळा बुडवून तेलात सोडा.वडे सोडायच्या आधी बोटाने बॅटरचा छोटा थेंब तेलात टाका. तो लगेच तळून आला कि तेल तापले आहे असे समजावे. वडे छान गोल्डन ब्राऊन रंग येई पर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या.
५. पावामध्ये चिंचेची गोड चटणी आणि तिखट चटणी लावून गरम गरम बटाटे वडे खायला द्या.





पाऊस पडत असेल तर आणखीन  छान..हातात वाफाळता चहा आणि 
गरम गरम वडा-पाव.
वा !! कल्पनेनीच मजा आली