Showing posts with label Snacks / One Dish Meals. Show all posts
Showing posts with label Snacks / One Dish Meals. Show all posts

दही कचोरी चाट -Dahi Kachori chaat

Read this Recipe in English
सर्व्हिंग: ४ मोठ्या कचोर्‍या

साहित्य:
कव्हरसाठी-
१ कप मैदा
२ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन
१ टीस्पून मीठ
चिमुटभर सोडा
१ टीस्पून साखर
सारणासाठी- १ उकडलेला मध्यम बटाटा,कुस्करून
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१ टीस्पून जिरे
१/४ टीस्पून हिंग
१ १/२ टीस्पून धनेपूड
१ टीस्पून जिरेपूड
३-४ मध्यम लसून पाकळ्या,बारीक चिरून
१/२" आलं,बारीक चिरून
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून छोले मसाला (किंवा १/२ टीस्पून गरम मसाला+ १/४ टीस्पून आमचूर पावडर)
२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
मीठ चवीप्रमाणे
कचोरी तळण्यासाठी तेल
१/२ कप हिरवी तिखट चटणी 
१ कप चिंचेची गोड चटणी 
२ कप फेटलेले दही+ २ टीस्पून साखर
१/२ कप मोड आलेले हिरवे मुग, वाफवून
२ कप बारीक शेव
१ कप बारीक चिरलेला कांदा


कृती:
१. कव्हरसाठी - मैदा ,सोडा,मीठ आणि साखर हाताने एकत्र करून घ्या.कचोरी खुसखुशीत होण्यासाठी २ टेबलस्पून तेल(मोहन) धूर येई पर्यंत कडकडीत गरम करा आणि पिठात ओता. चमच्याने तेल (मोहन) पिठात मिक्स करा.
२. गार पाण्याने पुरीला मळतो तितके घट्ट पीठ मळुन घ्या.पीठ छान मुरण्यासाठी १ तास झाकून ठेवा.
३. सारणासाठी- कढईत तेल गरम करा. तेल चांगले तापले कि, जिरे घाला. बारीक चिरलेली लसून आणि आलं घाला. खमंग वास आला कि कांदा घालून परता.
४. कांदा शिजला कि, हळद,तिखट आणि छोले मसाला घालून परता. कुस्करलेला बटाटा घालून परता. मीठ आणि कोथिंबीर घालून मिक्स करा. एक वाफ आणून गॅस बंद करा. सारण थोडं थंड होऊ दे.
कचोरी तयार करा- 
५. पीठाचे समान गोळे करा (२१/२"चे गोळे) आणि ५" व्यास आणि २mm जाडीला असेल असे गोल लाटून घ्या. खूप पात्तळ किंवा खूप जाड लाटु नका.लाटलेली गोल पुरी हातात घेऊन त्याला खोलगट द्रोणासारखा आकार द्या.
६. सारण मुठीत घेऊन दाबून त्याचा १ १/२" आकाराचा गोळा बनवा.पुरीच्या मध्यभागी सारणाचा गोळा ठेवा. पीठ एकमेकांना चिकटवण्यासाठी कडांना किंचित पाणी लावा आणि सगळ्या बाजूंनी झाकून बंद करून घ्या.
किंचीतसेही सारण बाहेरून दिसत कामा नये. नाहीतर तळताना कचोरी फुटण्याची शक्यता असते.
७. सारण पुरीने झाकल्यावर जास्तीचे पीठ काढून घ्या. तळव्याने कचोरी हलक्या हाताने दाबून थोडीशी चपटी करा.

८. कढईत तेल गरम करा. तेल चांगले तापले कि गॅस बारीक करा आणि मंद आचेवर गोल्डन ब्राऊन रंग येई पर्यंत कचोर्‍या तळा.
कचोरी चाटची तयारी-
९. दह्यात साखर घालून दही चांगले फेटून घ्या. मोड आलेले हिरवे मुग मीठ घालून ३-४ मिनिटे वाफवून घ्या. 

१०. गरम कचोरी सर्व्हिंग प्लेट मध्ये ठेवा. कचोरीला मध्यभागी बोटाने खड्डा करा. त्यात ३-४ टेबलस्पून फेटलेले दही घाला. वरून हिरवे मुग, बारीक चिरलेला कांदा, गोड चटणी, तिखट चटणी आणि चिमुटभर चाट मसाला घाला.
११. वरून आवडीप्रमाणे हवी तेव्हढी शेव आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

टीप: 
१. कव्हर मध्ये जास्तीजास्त सारण भरले गेले कि कचो-या भरीव आणि छान लागतात.
२. कचोर्‍या तळण्याच्या आधी कव्हरचा छोटासा गोळा तेलात टाकून तेल व्यवस्थित तापले आहे याची खात्री करा. कव्हरचा गोळा हळू हळू तरंगत वर आला याचा अर्थ तेल तापले आहे.
३. कचोर्‍या तळताना बारीक आच ठेवा तरच त्या खुसखुशीत होतील.

दहीवडे-Dahi Vada

सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी

साहित्य:
१/२ कप उडदाची डाळ
१/४ कप मुगाची डाळ
मीठ चवीप्रमाणे
दह्याचे १ १/२ कप पात्तळ ताक  
१ १/२ कप घट्ट दही
साखर २ ते ३ टीस्पून
मीठ १/२ ते ३/४  टीस्पून
१/२ टीस्पून आले पेस्ट/ किसलेले आले
१ टेबलस्पून धने-जिरे पूड
१ टीस्पून लाल तिखट
१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
चिंचेची गोड चटणी (आवडीप्रमाणे)

कृती:
१. उडदाची डाळ आणि मुगाची डाळ ४-५ तास पाण्यात भिजत घाला. भिजलेल्या डाळी एकत्र करून पाणी न घालता बारीक वाटून घ्या. मीठ घालून ढवळून घ्या. मिश्रणात गरज वाटली तर अगदी किंचित (१ ते २ चमचे) पाणी घाला.
२. एकीकडे दह्याचे पात्तळ ताक करून घ्या.
३. घट्ट दही घोटून घ्या. त्यात मीठ साखर आणि आल्याची पेस्ट घाला. अगदी थोडेसे पाणी घालून थोडेसे पात्तळ करून घ्या. दही फ्रीज मध्ये ठेवून द्या.
४. कढईत तेल गरम करा. एका पातेल्यात गार पाणी घालून ठेवा.मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन रंगावर मध्यम आकाराचे वडे तळून घ्या वड्यांचा आकार खूप मोठा ठेवू नका.
५. तळलेले वडे लगेचच गार पाण्यात घाला. ३-४ च्या बॅच मध्ये वडे तळून घ्या. दुसरी बॅच तळून होईपर्यंत आधीचे वडे पाण्यातच ठेवा.
पाण्यात भिजल्यावर वड्याचा रंग फिक्कट होईल आणि वडे थोडेसे फुगून आकार मोठा होईल.वडे पाण्यातून काढताना किंचित पिळून पाणी काढून टाका आणि मग हे वडे ताकात भिजत घाला.
६. साधारण तास-दोन तास वडे ताकात भिजत फ्रीज मध्ये ठेवा.
७. सर्व्ह करताना, बाऊलमध्ये ताकातले वडे ठेवा. वरती घोटून ठेवलेले दही घाला. त्यावर धने-जिरेपूड, लाल तिखट चिमटीने घाला. आवडत असल्यास चिंचेची गोड चटणी घाला.कोथिंबीर घालून थंडगार दहीवडे सर्व्ह करा.






टीप: वड्याचे मिश्रण जास्ती पात्तळ झाले आणि वडे तळताना पसरायला लागले तर मिश्रणात थोडासा रवा घाला आणि वडे तळा.

वेजी फ्रॅन्की विथ चीज- Veg Frankie with cheese

सर्व्हिंग: ३  ते ४ माणसांसाठी


साहित्य:
५ ते ६ गव्ह्याच्या एकदम ताज्या पोळ्या ( १/२ ते ३/४ कप गव्हाचे पीठ, १/२ टीस्पून मीठ, १ टीस्पून तेल, पाणी)
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ कप पनीरचा  चुरा
३  टेबलस्पून बारीक चिरलेली फराजबी
३  टेबलस्पून बारीक चिरलेले  गाजर
३  टेबलस्पून बारीक चिरलेला फ्लॉवर
३  टेबलस्पून बारीक चिरलेली भोपळी मिरची
३ टेबलस्पून बारीक चिरलेला मशरुम
१/२ कप टोमॅटो चिरून
१ टीस्पून बारीक चिरलेलं आलं
१ टीस्पून बारीक चिरलेली लसूण 
१/४ टीस्पून हळद 
मीठ चवीप्रमाणे
२ टेबलस्पून पुदिन्याची तिखट चटणी
२ टेबलस्पून टोमॅटो  केचप
वरून घालण्यासाठी १/२ कप किसलेले चीज
२ टेबलस्पून बटर
गुंडाळी बांधण्यासाठी रिळाचा / पुडीचा  दोरा

कृती:
१. गव्हाचे पीठ मळून त्याचे १ १/२" गोळे करा. आणि नेहमी लाटतो तश्या गोल पण पोळ्या लाटून घ्या. पोळ्या भाजून त्यांना तूप किंवा बटर लावून झाकून ठेवा.
२. कढईत १ टेबलस्पून बटर गरम करा. त्यात बारीक चिरलेलं आलं-लसूण घालून परता. नंतर कांदा घालून २ मिनिटे परता. हळद घालून परता मग लगेचच टोमॅटो आणि पनीर सोडून इतर सर्व भाज्या घालून परता. मीठ घाला. 
३. झाकण ठेवून भाज्या वापवून घ्या. नंतर टोमॅटो घालून परता मग पनीरचा चुरा घालून परता.गॅस बंद करा. 
४. एका ताटात पोळी घ्या. पोळीला चमचाभर पुदिन्याची तिखट चटणी पसरून लावा. केचप पसरून लावा. डावानी थोडीशी भाजी घाला आणि अलगद  पोळीची गुंडाळी करा. 
५. दो-याने  गुंडाळून एक गाठ मारा म्हणजे गुंडाळी उघडणार नाही. नंतर तवा गरम करा आणि बटरवर  पोळीची गुंडाळी (फ्रॅन्की) दोन्ही बाजूनी भाजून घ्या. फ्रॅन्कीला किंचित  ब्राऊन डाग पडले पाहिजेत.  फ्रॅन्कीला बांधलेला दोरा कात्रीने कापून टाका.गरम गरम फ्रॅन्कीवर चीज किसून घाला आणि सर्व्ह करा. 

दाल बाटी-Dal Bati

सर्व्हिंग: १०  बाट्या



साहित्य:
१ १/२ कप गव्हाचं पीठ
१/२ कप रवा
१/२ कप तुपाचे 
मोहन ( वितळलेलं ) 
१/४ बेकिंग पावडर
१ टीस्पून मीठ
१/२ टीस्पून ओवा
१ टीस्पून जिरे
तूप

कृती:
१.  एका ताटात गव्हाचे पीठ,रवा,बेकिंग पावडर, जिरे, ओवा आणि मीठ एकत्र करून घ्या.
२. त्यात तुपाचे मोहन घालून हाताने कालवून घ्या. गार पाण्याने  घट्ट पीठ मळुन घ्या. 
३. मळलेले पीठ १ तास झाकून ठेवा.एकीकडे दाल बनवून घ्या. नंतर पीठाचे २" चे गोळे करा. हाताच्या तळव्याने दाबून किंचित चपटे करा. इंदोरकडे अशा चपट्या बाटीला बाफले म्हणतात.
४. इडली स्टँडला  तेलाचा हात लावून  हे गोळे ठेवा. इडलीपात्रात ठेवून इडलीसारखे १० मिनिटे वाफवून घ्या.
५. वाफवलेले गोळे थोडे थंड झाले कि, प्रत्येक गोळ्यावरून  किंचित तेल सोडा. ४५० F तापमानाला ओव्हन प्रीहीट करा.बेकिंग ट्रेला तेलाचा हात लावून त्यावर अंतर अंतरावर गोळे ठेवा आणि एकूण ३५ -४० मिनिटे बेक करा.साधारण १५ मिनिटांनी गोळे उलटा आणि आणखीन १५ ते २० मिनिटे गुलाबी रंग येई पर्यंत बेक करा. बेक होताना बाटीला थोड्याश्या भेगा पडतील.

५. बाटीचा वरचा भाग कडक असतो आणि आतून मऊ असते. गरम गरम बाटी कापडात धरून हाताने फोडा.एका बाउलमध्ये  फोडलेली बाटी (बाटीचा चुरा) घ्या. त्याच्यावर १/२ वाटी तूप ओता २-३ मिनिटांनी  तूप छान मुरेल.त्यावर दाल घाला आणि गरम गरम दाल बाटी सर्व्ह करा. सोबत कच्चा कांदा सर्व्ह करा.

टीप:
दाल-बाटी मध्ये तूप भरपूर वापरा तरच दाल-बाटी छान लागेल.
बरेच जण बेक करायच्या आधी उकळत्या पाण्यात बाट्या सोडून १० मिनिटे शिजवून घेतात. पण त्यामुळे वरचे कवच मऊ पडून पीठ पाण्यात मिक्स होते आणि वाया जाते त्यामुळे मी बाट्या इडली स्टँडवर वाफवून घेतल्या होत्या.

ओनिअन उत्तपा-Onion Uttapum

Read this recipe in English
सर्व्हिंग: ४-५ उत्तपा

साहित्य:
१/२ कप उडदाची डाळ + १ १/४ कप तांदूळ/ इडली रवा
२ कप बारीक चिरलेला  कांदा
१/४ कप कोथिंबीर
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
१ टोमॅटो  बारीक चिरून (आवडीप्रमाणे)
मीठ चवीप्रमाणे
१/४ कप तेल

पूर्वतयारी : उडदाची डाळ आणि तांदूळ वेग-वेगळ्या पातेल्यात ४-५ तास भिजत घाला. डाळ पूर्ण भिजली कि मिक्सरवर १/४ कप पाणी घालून बारीक वाटून घ्या. तांदूळ बारीक वाटून घ्या. दोन्ही वाटणे एकत्र करून नीट ढवळून घ्या. मिश्रण थोडेसे जाड असले तरी चालेल पण खूप पात्तळ करू नका. एखाद्या उबदार जागी झाकून ठेवा. १०-१२ तासांनी मिश्रण आंबेल आणि फुगून वर येईल.  पिठात १/२ टीस्पून मीठ आणि खूप (घट्ट) जाड असेल तर १/४ कप पाणी घालून पात्तळ करून घ्या. या पीठाचे उत्तपे काढा.

कृती:
१. कांदा,कोथिंबीर आणि बारीक चिरलेली मिरची आवडत असेल तर बारीक चिरलेला टोमॅटो एकत्र करून घ्या.
२. तव्यावर २ टीस्पून तेल घालून तवा गरम करा. तेल तापले कि मोठ्या डावानी पीठ गोल पसरवा. शक्यतो डाव तव्याला घासू नका.म्हणजे उत्तपा एकाच जाडीचा होईल. वाटल्यास तवा थोडा हलवून पीठ पसरवले तरी चालेल.
३. पीठ तव्यावर घातल्यावर वरून  कांदा-कोथिंबीर पसरवा. हाताने हलकेच दाब द्या. सगळ्या बाजूने चमचाभर तेल घाला आणि वरून घट्ट झाकण ठेवा. ३-४ मिनिटे झाकण तसेच राहू दे म्हणजे कांदा वाफेने शिजून येईल.
४. झाकण काढून टाका. उत्तप्याची खालची बाजू गोल्डन ब्राऊन झाली कि उत्तपा उलटवा. बाजूने पुन्हा थोडे तेल सोडा. दोन्ही बाजू छान भाजल्या गेल्यावर गरम गरम उत्तपा- सांबार  , नारळाच्या चटणी बरोबर सर्व्ह करा.

टीप: थंडीत अनेकदा पीठ आंबत नाही. अश्यावेळेस पिठात ड्राय यीस्ट कोमट पाण्यात साखरेबरोबर विरघळवून घालावे आणि मग उबदार जागी ठेवावे म्हणजे पीठ छान फुगून येते. हेच पीठ इडली, डोसा यासाठी वापरता येते. परंतु उत्तप्यासाठी पीठ थोडे पात्तळ करावे लागते.

वडा-पाव-Batata Vada Pav

Read this recipe in English
Servings : ६-७ वडे

साहित्य:
३-४ उकडलेले बटाटे  
२-३  लसूण पाकळ्या+ १/२" आलं +१ हिरवी  मिरची - यांची  पेस्ट  
२ टेबलस्पून कोथिंबीर
४-५  कढीपत्ता पाने
१/४  टीस्पून मोहरी  
१/४  टीस्पून हळद
१ टेबलस्पून तेल
मीठ चवीप्रमाणे  
लादी पाव
वड्याच्या कव्हरसाठी-
३/४ कप बेसन
१/२ कप ते ३/४ कप पाणी
१/४ टीस्पून हळद
मीठ चवीप्रमाणे


कृती:
१. उकडलेले बटाटे सोलून हाताने कुस्करून घ्या. त्यात आलं-लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट,मीठ आणि कोथिंबीर बारीक चिरून घाला.हाताने छान कालवून घ्या. चव बघून मीठ -मिरचीचे प्रमाण वाढवा.
२. फोडणीच्या कढईत  तेल गरम करा. तेल कडकडीत तापले कि त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली कि, कढीपत्ता पाने, हळद आणि हिंग घालून कुस्करलेल्या बटाट्याला फोडणी द्या. हाताने, फोडणी पूर्ण सारणात मिक्स करा आणि त्याचे समान ६-७ (अंदाजे २ १/२"- ३" व्यासाचे)  गोळे करा.
३. वड्याच्या कव्हर साठी-  ३/४ कप बेसन घ्या. त्यात हळद,मीठ आणि बेताचे पाणी घालून एकजीव करा. बॅटर जास्ती पात्तळ किंवा खूप जाड नको.चमच्याने वरून खाली टाकून बघा. तार यायला पाहिजे. साधारण १/२ कप -३/४ कप पाणी घालून बघा. लागल्यास आणखीन पाणी घाला. बॅटर मध्ये १ चमचा कडकडीत तेलाचे मोहन घाला म्हणजे कव्हर कुरकुरीत होईल.
४. वडे तळण्यासाठी कढईत पुरेसे तेल घ्या. तेल तापले कि बॅटरमध्ये सारणाचा गोळा बुडवून तेलात सोडा.वडे सोडायच्या आधी बोटाने बॅटरचा छोटा थेंब तेलात टाका. तो लगेच तळून आला कि तेल तापले आहे असे समजावे. वडे छान गोल्डन ब्राऊन रंग येई पर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या.
५. पावामध्ये चिंचेची गोड चटणी आणि तिखट चटणी लावून गरम गरम बटाटे वडे खायला द्या.





पाऊस पडत असेल तर आणखीन  छान..हातात वाफाळता चहा आणि 
गरम गरम वडा-पाव.
वा !! कल्पनेनीच मजा आली 

पाव भाजी-Pav bhaji

Read this recipe in English
सर्व्हिंग: ३ ते ४ माणसे
साहित्य: 
२ ते ३ मध्यम आकाराचे बटाटे
१ कप फ्लॉवरचे तुरे
१ छोटे गाजर तुकडे करून
१/२ भोपळी मिरची चौकोनी तुकडे करून
३-४ फरजबी तुकडे करून
१/४ कप मटार
१ १/२ टोमॅटो बारीक चिरून
१ टेबलस्पून कोथिंबीर
१/२ टीस्पून हळद
१ १/४ टीस्पून लाल तिखट
१ टेबलस्पून लसूण बारीक चिरून
१ १/२ कप बारीक चिरलेला कांदा
२ ते ३ टीस्पून पावभाजी मसाला (मी एव्हरेस्ट किंवा बादशाहचा वापरते)
मीठ चवीप्रमाणे
बटर
लादी पाव किंवा स्लाइस ब्रेड

कृती: 

१. कांदा,मटार आणि टोमॅटो सोडून इतर सगळ्या भाज्या १ कप पाणी घालून कुकरमध्ये उकडून घ्या.कुकर थंड झाल्यावर उकडलेल्या भाज्या मॅश करून घ्या.
२. पातेल्यात २ टेबलस्पून बटर गरम करा त्यात लसूण घाला. खमंग वास सुटला कि १ कप बारीक चिरलेला कांदा २ ते ३ मिनिटे परतून घ्या. मग हळद,तिखट, १ टीस्पून पावभाजी मसाला आणि टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परता.
३. मॅश केलेल्या भाज्या घालून परता.मटार घाला. मीठ आणि पाव भाजी मसाला घालून मिक्स करा. झाकण ठेवून वाफ आणा. आंबटपणा कमी वाटला तर किंचित आमचूर घाला किंवा लिंबू पिळा.
४. पाव बटर लावून भाजून घ्या.गरम भाजी, पावा बरोबर आणि कांद्या बरोबर सर्व्ह करा.

डाळ-ढोकळी-Dal Dhokli

सर्व्हिंग:  ते ३ माणसे

साहित्य :
ढोकळीसाठी-
१ १/२ कप गव्हाचं पीठ
१ १/२ टीस्पून तीळ
१/४ टीस्पून ओवा
१/४ टीस्पून धनेपूड
१/४ टीस्पून जिरेपूड
१/२ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून साखर
३/४ टीस्पून मीठ
आमटीसाठी-
१  कप तुरीची डाळ
१ मुठ शेंगदाणे
१ हिरवी मिरची
१/२ टीस्पून हळद
१ १/२ टीस्पून लाल तिखट
३ टीस्पून गूळ
१/२  टीस्पून धनेपूड
१/२ टीस्पून जिरेपूड
२-३ आमसुलं
फोडणीसाठी- ( १ टेबलस्पून तूप, १/४ टीस्पून मोहरी,१/२ टीस्पून जिरे,३-४ लवंगा,६-७ काळी मिरी,
१" दालचिनीचा तुकडा,५-६ कढीपत्ता पाने,१/४ टीस्पून हिंग)

कृती :
१. आमटीसाठी-
कुकरमध्ये तुरीची डाळ, शेंगदाणे आणि हिरवी मिरची एकत्र शिजवून घ्या. डाळ शिजली कि घोटून घ्या.
२. त्यात ६ कप पाणी घाला. हळद, तिखट,धनेपूड, जिरेपूड, गूळ, मीठ,आमसुलं घालून उकळून घ्या.
३.फोडणीच्या कढईत तूप गरम करून आधी मोहरी घाला. मोहरी तडतडली कि जिरे आणि लवंग,मिरी,दालचिनी घाला.शेवटी कढीपत्ता आणि हिंग घालून आमटीला वरून फोडणी द्या.
४. ढोकळीसाठी-
गव्हाच्या पिठात हळद, तिखट,धनेपूड, जिरेपूड, तीळ, ओवा, मीठ, साखर घालून नीट मिक्स करून घ्या. १ टीस्पून तेल (थंड मोहन) घाला आणि पुरेसे पाणी घालून पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्या. १/२ तास पीठ झाकून ठेवा म्हणजे चांगले मुरेल.
५. पीठाचे ३-४" चे गोळे करून पोळी लाटून घ्या. आणि सुरीने शंकरपाळ्यांच्या आकारात कापून घ्या. पोळी जास्ती पात्तळ लाटू नका.साधारण २-३mm जाडी ठेवा.
६. कापलेल्या शंकरपाळ्या (ढोकळी) उकळत्या आमटीत सोडा आणि ३-४ मिनिटे उकळत ठेवा. आमटी थोडी पात्तळच करा ढोकळी गव्हाच्या  पिठाची असल्यामुळे नंतर आमटी जाड होते.
७. बाउलमध्ये वरती तूप घालून गरम गरम डाळ ढोकळी सर्व्ह करा.

शाकाहारी धानसाक -Vegetarian Dhansak


This delicious and popular Parsi dish. It can also made with chicken or lamb.Dhansak is traditionally served with Brown Rice and Cucumber salad.
Read this recipe English
सर्व्हिंग: ३ ते ४ माणसांसाठी



साहित्य :
भाजीसाठी-
२ कप चिरलेली मेथी
१ बटाटा
१ छोटं वांगं
१ दुधी भोपळ्याचा छोटा तुकडा ( अंदाजे २")  
१ कप बारीक चिरलेला कांदा
१/२ कप तुरीची डाळ 
१/४ कप मुगाची डाळ 
१/२  कप कोथिंबीर 
२ हिरव्या मिरच्या
५-६ लसूण पाकळ्या 
४-५ मिरी
२-३ लवंगा
१/२ टीस्पून धनेपूड 
१/२ टीस्पून जिरेपूड
१ टेबलस्पून लिंबुरस
२ टेबलस्पून तूप  
भातासाठी-
१ १/२ कप बासमती तांदूळ
३ कप पाणी  
३ टीस्पून साखर
२ टेबलस्पून तूप

कृती :
१. तुरीची डाळ आणि मुगाची डाळ धुवून घ्या. कुकर मध्ये मेथी,बटाटा,वांगं आणि दुधी भोपळ्याचा तुकडा या सगळ्या बरोबर शिजवून घ्या.
२. कुकर सुटला कि सगळा मिश्रण नीट घोटून घ्या किंवा मिक्सर मध्ये घालून बारीक करा.
३. कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, धने-जिरे पूड,लिंबू रस, मिरी आणि लवंगा मिक्सरवर बारीक वरून घ्या.
४. पातेल्यात तूप गरम करून त्यात कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. मग वाटण घालून ते परतून घ्या. खमंग वास सुटल्यावर, डाळ आणि भाज्यांचे मिश्रण घालून परता.
५. मीठ घालून १ उकळी काढा.
६. वेगळ्या पातेल्यात २ चमचे साखर घाला. पातेले गॅसवर तापवत ठेवा. साखर वितळली कि लगेच तूप घाला.
७. त्यात धुतलेले तांदूळ घालून ते ३-४ मिनिटे परता. तांदुळाच्या दुप्पट पाणी घाला. मीठ घालून भात शिजवून घ्या.साखर जळल्यामुळे भाताला ब्राऊनसर रंग येईल.

टीप : ताटात भात वाढून मध्ये गोल खड्डा करतात आणि त्यात मध्यभागी भाजी वाढून सर्व्ह करण्याची पद्धत आहे.

मिसळ-पाव- Misal Pav

Read this recipe in English
सर्व्हिंग: ३ ते ४ माणसांसाठी






साहित्य : 
उसळी साठी-
२ कप मोड आलेली मटकी
३/४ वाटी बारीक चिरलेला कांदा
१/४ टीस्पून मोहरी, १/४ टीस्पून हिंग, १ टीस्पून लाल तिखट , १/४ टीस्पून हळद,
१ टीस्पून गोडा मसाला
२ टेबलस्पून तेल
मीठ चवीप्रमाणे
फोडणीच्या पोह्यांसाठी-
२ मुठी जाड पोहे
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१ हिरवी मिरची ,१/४ टीस्पून मोहरी, १/४ टीस्पून हिंग
मीठ, साखर चवीप्रमाणे
बटाट्याच्या  भाजीसाठी-
१ उकडलेला मध्यम बटाटा
१/४ कप कांदा
१/४ टीस्पून हळद
मीठ चवीप्रमाणे
१ हिरवी मिरची
१/४ टीस्पून जिरे
१ चिमुट हिंग  
२ टेबलस्पून तेल 
कट बनवण्यासाठी-
७-८ कप पाणी
२ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
२ टेबलस्पून भाजलेलं सुकं खोबरं
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
२ १/२ टोमॅटो बारीक चिरून,
२ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हळद
१ टीस्पून चिंचेचा कोळ
चिमुटभर साखर
मीठ चवीप्रमाणे

२ कप फरसाण, शेव-पात्तळ पोहे चिवडा
१/२ कप टोमॅटो बारीक चिरून
१/२ कप कोथिंबीर
१/४ कप चिंचेची गोड चटणी( optional )
१/४ कप दही (optional )
६-८ लादी पाव

कृती : 
१. बटाटा उकडून त्याच्या बारीक फोडी करून ठेवा. कांदा चिरून ठेवा. पोहे भिजवून त्यांना मीठ हळद साखर लावून ठेवा.
२. मटकी ७-८  कप पाण्यात घालून गॅसवर शिजवत ठेवा.
३. १०-१५ मिनिटे पाणी चांगले उकळले कि मटकी शिजेल. ती बाजूला काढून ठेवा. उरलेले पाणी बाजूला ठेवा.
नंतर कट करण्यासाठी त्याच पाण्याचा वापर करा. म्हणजे कट जास्ती टेस्टी लागेल.
४. उसळी साठी -
एका पातेल्यात तेल तापवून हिंग-मोहरीची फोडणी करा. कांदा परता.
मग मटकी घाला.हळद, तिखट, गोडा मसाला घाला. मीठ घालून २ वाफा आणा. उसळ बाजूला ठेवा.
५.झणझणीत तिखट कटासाठी -
पातेल्यात तेल तापवून कांदा फोडणीला घाला. आलं-लसूण पेस्ट घालून परता. खमंग वास सुटला कि १-२ मिनिटे सुकं खोबरं परता आणि मग कांदा-टोमॅटो घालून परता. लाल तिखट हळद मीठ घाला. तेल सुटे पर्यंत परता. मटकीचे उरलेले पाणी घाला.मीठ आणि चिंचेचा कोळ घाला. चिमुटभर साखर घाला. उकळी काढा. कटाचा तिखटपणा आवडी प्रमाणे कमी जास्त करा.
६. फोडणीच्या पोह्यांसाठी-
कढईत तेल गरम करून हिंग मोहरीची फोडणी करा. हिरवी मिरची तुकडे करून घाला.कांदा घालून परता. नंतर भिजवलेले पोहे घालून परता. १-२ वाफा आणा.
७.बटाट्याच्या भाजीसाठी-
कढईत  तेल गरम करा आणि जिरे आणि हिरवी मिरची तुकडे करून  फोडणीला घाला. कांदा घालून परता.हळद घाला.कांदा शिजला कि बटाट्याच्या फोडी घाला.मीठ घालून १ वाफ आणा.
८.मिसळीची डिश तयार करा. सर्वात आधी खाली फोडणीचे पोहे घाला. वरती बटाट्याची  भाजी, मटकी उसळ, कांदा-टोमॅटो आणि कट घाला.थोडी गोड चटणी. आणि सर्वात वरती फरसाण घाला. कोथिंबीर घालून पावाबरोबर सर्व्ह करा.

मिसळीसाठी क्रम
१. तळाला पोहे
२. त्याच्यावर बटाट्याची भाजी
३. मग मटकीची उसळ
४. कांदा
५. तर्री (कट)
६. सर्वात वरती फरसाण

टीप : कटाचा तिखटपणा मिसळ खाताना सगळं एकत्र झालं कि कमी वाटतो. त्याप्रमाणे कटाचा तिखटपणा वाढवावा.