Showing posts with label Veg Main Course. Show all posts
Showing posts with label Veg Main Course. Show all posts

पनीर बटर मसाला-Paneer Butter Masala

Read this recipe in English 
सर्व्हिंग:
२ ते ३ माणसांसाठी

साहित्य: 
१७५ ग्रॅम पनीर
२ मध्यम कांदे,बारीक चिरून
१/२" आलं+ ३-४ मध्यम लसूण- यांची पेस्ट
५-६ तळलेले काजू
३ टोमॅटोची जाड प्युरी
१/२ टीस्पून गरम मसाला
१ १/४ टीस्पून धनेपूड
१ टीस्पून जिरे पूड
१ टीस्पून लाल तिखट (बेडगी)
१ टीस्पून हळद
१ टीस्पून कसुरी मेथी, चुरडून
१/४ कप जाडसर क्रीम
मीठ आणि साखर चवीप्रमाणे
३-4 टेबलस्पून बटर

कृती:
१. पनीरचे चौकोनी तुकडे करून बटरवर शालो फ्राय करून घ्या.
२. टोमॅटोची जाड प्युरी करून ठेवा. आलं-लसूण पेस्ट करून घ्या.
३. कढईत २ टेबलस्पून बटर गरम करा. त्यातच १ चमचा तेल घाला. मग आलं-लसूण पेस्ट घालून मिनिटभर परता. नंतर कांदा घालून शिजेपर्यंत परता.
४. कांदा शिजला कि, त्यात हळद,तिखट,गरम मसाला,धने-जिरे पूड आणि किंचित मीठ घालून छान वास सुटे पर्यंत परतून घ्या. गॅस बंद करा.
५. हे सगळे मिश्रण आणि तळलेले काजू एकत्र करून मिक्सरवर एकदम बारीक वाटून घ्या. गरज वाटल्यास पाणी न घालता थोडीशी टोमॅटो प्युरी घालून वाटा.
६. आता पुन्हा कढईत १ टेबलस्पून बटर गरम करा आणि वाटलेला कांदा आणि काजूची पेस्ट घालून २-३ मिनिटे परता.
७. मग टोमॅटो प्युरी,मीठ आणि साखर  घालून नीट मिक्स करा. झाकण ठेवून ८-१० मिनिटे ग्रेवी  शिजवत ठेवा. कसुरी मेथी घाला आणि गॅस बंद करा.
८. पनीरचे तुकडे घालून हलक्या हाताने मिक्स करा.झाकण ठेवून ५-७ मिनिटांनी वरून क्रीम घाला आणि हलक्या हाताने एकत्र करा.
९.  वरून कोथिंबीर किंवा पुदिन्याच्या पानांनी सजवा आणि रोटी किंवा नान बरोबर सर्व्ह करा.

राजमा तिखट रस्सा -Rajma Tikhat Rassa


Read this recipe in English
सर्व्हिंग :
२ माणसांसाठी



साहित्य: 
१/२ कप राजमा ( १ १/४ कप भिजवलेला राजमा)
३/४ कप बारीक चिरलेला कांदा
१ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट (दोन्ही सारख्या प्रमाणात)
१ १/२ टोमॅटो, चिरून
२ १/४ टीस्पून धनेपूड
१ टीस्पून जिरेपूड
१ टीस्पून जिरे
१ १/२ लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
मीठ चवीप्रमाणे
२ टेबलस्पून तेल 


कृती: 
१.राजमा रात्रभर(७-८ तास पाण्यात भिजवून ठेवा.) भिजवलेला राजमा मीठ घालून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्या. राजमा जास्ती शिजला तर एकत्र होऊन लगदा होतो त्यामुळे १ किंवा २ शिट्ट्याच करा.
२.पातेल्यात तेल गरम करा. तेल तापले कि, जिरे घाला. आले-लसूण पेस्ट घाला. खमंग वास आला कि, कांदा घालून परत. कांदा शिजला कि, हळद,लाल तिखट,धने-जिरेपूड आणि चिरलेला टोमॅटो घालून तेल सुटे पर्यंत परता.
३.तेल सुटले कि मग शिजवलेला राजमा घालून ढवळा. १० मिनिटे उकळत ठेवा. नंतर गॅस बंद करून वरून कोथिंबीर घाला आणि पोळी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.

वालाचं बिरडं-Valacha Birda

सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी

साहित्य:
१/२ कप कडवे वाल (मोड आल्यावर साधारण १ १/२ कप होतील )
३/४ कप बारीक चिरलेला कांदा
९-१० मिरी,ठेचून
७-८ लसूण पाकळ्या,ठेचून/चिरून
१/२ कप खवलेलं ओलं खोबरं
१ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१ टेबलस्पून गुळ, किसलेला
३ आमसुलं / १/२ टीस्पून  चिंचेचा कोळ
मीठ चवीप्रमाणे
२ टेबलस्पून तेल

पूर्व तयारी: वाल १०-१२ तास पाण्यात भजत घाला. भिजलेले  वाल १८-२० तास चाळणीत उपसून एखाद्या उबदार जागी ठेवा म्हणजे त्याला लांब मोड येतील.
चं लांब मोड आले कि वाल गार पाण्यात भिजवून ठेवा म्हणजे त्याची साले निघून येतील. वालाची साले काढून वाल सोलून घ्या.

कृती:
१. पातेल्यात तेल गरम करा. तेल चांगले तापले कि, लसूण फोडणीला घाला. लसूण गुलाबी झाली मग कांदा घालून परता. मिरी ठेचून घाला. ३-४ मिनिटे कांदा परतून घ्या.
२. सोललेले  वाल घाला. दीड ते पावणे दोन कप पाणी घाला आणि झाकण ठेवून  साधारण २५-३० मिनिटे शिजवत ठेवा.
३. वाल पूर्ण शिजले कि, हळद,तिखट ओलं खोबरं आणि मीठ घाला. ढवळून ३-४  मिनिटे उकळत ठेवा.
४. सर्वात शेवटी गुळ आणि आमसुलं घाला. झाकण ठेवून ७-८ मिनिटे शिजवत ठेवा. वरून कोथिंबीर घाला आणि पोळी बरोबर सर्व्ह करा. 

खतखते-Khatkhate



खतखते हा गोव्याकडचा खूप प्रसिद्ध कोकणी पदार्थ आहे.वेगवेगळ्या भाज्या आणि तुरीची डाळ डाळ वापरून खतखते केले जाते. सण-समारंभाला खतखते करण्याची पद्धत आहे. खतखत्याबरोबर साधा भात किंवा पोळी सर्व्ह करतात, पण खतखते नुसते खाल्ले तरी मस्त लागते. सगळ्या भाज्यांना एकत्र शिजवल्यामुळे खतखत्याला एक मस्त स्वाद येतो.
काही ठराविक कोकणी पदार्थ म्हणजे अनसा-फणसाची भाजी, खतखते, उडदा मेथी, मुगा- गाठी म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच ! आजीकडे गणेश चतुर्थीला सकाळी जेवायला खतखते नाही असे कधी व्हायचेच नाही. उकडीचे मोदक आणि खतखते हा ठरलेला बेत!


Read this recipe in English
सर्व्हिंग: ३-४ माणसांसाठी

साहित्य: 
१/२ कप तुरीची डाळ
१/२ कप खवलेलं ओलं खोबरं
१ मुठ शेंगदाणे
१ हिरवी मिरची
४-५ आमसुलं
२ मक्याची कणसं (अमेरिकन स्वीटकॉर्न)
१ छोटा बटाटा, मध्यम चौकोनी फोडी करून
रताळ्याच्या ७-८ मध्यम चौकोनी फोडी
भोपळी मिरचीचे ७-८ चौकोनी तुकडे
काकडीच्या ७-८ मध्यम चौकोनी फोडी
मुळ्याच्या ५-६ चौकोनी मध्यम फोडी
६-७ फरसबीचे , १" लाबीचे तुकडे
लाल भोपळ्याच्या ५-६ मध्यम आकाराच्या फोडी
दोडक्याच्या ५-६ मध्यम आकाराच्या फोडी
१/२ टीस्पून हळद
१/२ टीस्पून लाल तिखट
मीठ आणि साखर चवीप्रमाणे
फोडणीसाठी- 
२ टेबलस्पून तेल
१/२ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
५-६ कढीपत्ता पाने 

कृती: 
१. कणसाचे २ १/२" ते ३" चे तुकडे करून घ्या. तुरीची डाळ, शेंगदाणे, कणसाचे तुकडे आणि १ हिरवी मिरची कुकरमध्ये एकत्र शिजवून घ्या.
२. पातेल्यात थोडे पाणी घाला. त्यात बाकीच्या सगळ्या भाज्या घाला आणि झाकण ठेवून शिजवून घ्या.
३. डाळ शिजली कि चांगली घोटून घ्या. त्यात वेगळ्या शिजवून घेतलेल्या भाज्या,कणसाचे तुकडे,शिजलेले शेंगदाणे घाला. पाणी घालून थोडं पात्तळ करून घ्या.
४. ओलं खोबरं गरम पाणी घालून बरीन वाटून घ्या. डाळ आणि भाज्यांमध्ये वाटलेलं खोबरं मिक्स करा. आमसुलं घालून ढवळा.
५. हळद,तिखट,मीठ साखर घालून ढवळून घ्या. रस्सा भाजी ५-१० मिनिटे चांगली उकळत ठेवा.
६. फोडणीच्या कढईत तेल गरम करा. तेल चांगले तापले कि, मोहरी घाला. मोहरी तडतडली कि, कढीपत्ता पाने आणि हिंग घाला आणि रस्याला फोडणी द्या.
७. खतखतं पोळी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.

काजूची उसळ-Kajuchi (Cashew nuts) Usal

ओल्या काजूची उसळ कोकण आणि गोव्याकडे खूप प्रसिद्ध आहे. सणावाराच्या दिवशी किंवा लग्न समारंभात खास बेत म्हणून काजूची उसळ केली जाते. काजूची उसळ वेगवेगळ्या पद्धतीने करतात. सहज सोपी आणि एकदम चविष्ट अशी हि रेसिपी नक्की करून बघा :)
Read this recipe in English

सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी

साहित्य: 
२ कप न सोललेले कच्चे काजू (ओले काजू )
१ कप मटार (आवडीप्रमाणे)
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ टीस्पून हळद
हिंग
४-५ कढीपत्ता पाने
१/२ टीस्पून धनेपूड
१/२ टीस्पून जिरेपूड
वाटणासाठी-
१/२ कप ओलं खोबरं
४-५ मिरी
१ हिरवी मिरची 
चिमुटभर साखर
मीठ चवीप्रमाणे
३ टेबलस्पून तेल

कृती: 
१. काजू १-२ तास कोमट पाण्यात भिजवून ठेवा. काजू पूर्ण भिजले कि त्याची साले काढून टाका.
२. खोबरं, मिरी, हिरवी मिरची मिक्सरवर बारीक वाटून घ्या. कढईत तेल गरम करा आणि कढीपत्ता फोडणीला घाला. लगेचच कांदा घालून २-३ मिनिटे परतून घ्या.
३. नंतर वाटलेला मसाला घालून परता. हळद ,धने-जिरेपूड, मीठ आणि साखर घाला. १ उकळी काढून काजू आणि मटार घालून परता.
४. झाकण ठेवून ५-१० मिनिटे काजू आणि मटार चांगले शिजू द्या. गॅस बंद करा. वाफ मुरली कि पोळी बरोबर उसळ सर्व्ह करा.

टीप: मटार न वापरता नुसत्या काजूची उसळ सुद्धा करतात.

व्हेज मंचुरियन-Veg Manchurian

सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी

साहित्य:
मंचुरियन बॉल्ससाठी-
१ गाजर किसून
४-५ कोवळी फरजबी बारीक चिरून
१/४ कप बारीक चिरलेला फ्लॉवर
१/४ कप बारीक चिरलेला कोबी
१/४ कप बारीक चिरलेली कांद्याची पात
१ टीस्पून किसलेलं आलं
१/४ टीस्पून मिरपूड
१ टेबलस्पून सोया सॉस
१ चिमुट अजिनोमोटो
१ टीस्पून चिली सॉस
१ टीस्पून विनेगर
१/४ टीस्पून साखर
१/२ कप साधा भात
४ ते ५ टेबलस्पून मैदा
मीठ चवीप्रमाणे
तळ्ण्यासाठी तेल
मंचुरियन सॉस साठी-
२ कप व्हेजिटेबल स्टॉक
१/४ कप डार्क सोया सॉस
१ हिरवी मिरची
१ टीस्पून बारीक चिरलेलं आलं
१ टीस्पून बारीक चिरलेली लसूण
१ चिमुट अजिनोमोटो
१ टीस्पून साखर
२ टीस्पून विनेगर
२ टीस्पून चिली सॉस
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ कप बारीक चिरलेली कांद्याची पात
१/४ कप उभी चिरलेली भोपळी मिरची
१/४ कप बारीक चिरलेला कोबी
१ १/२ टेबलस्पून कॉर्नफलोर
२ टेबलस्पून तेल
मीठ चवीप्रमाणे

कृती:
१. मंचुरियन बॉल्ससाठी दिलेल्या सगळ्या भाज्या एका पातेल्यात घ्या. पातेल्यात १ १/२ कप पाणी आणि १/४ टीस्पून मीठ घाला आणि झाकण ठेवून भाज्या वाफवून घ्या.
२. दुस-या पातेल्यावर एक कॉटनचे पात्तळ (सुती) कापड घाला आणि कापडावर वाफवलेल्या भाज्या पाण्यासकट ओता. कापड चारही बाजूंनी धरून भाज्या घट्ट पिळून घ्या. खाली गळलेलं पाणी (व्हेजिटेबल स्टॉक) मंचुरियन सॉस बनवण्यासाठी बाजूला ठेवून द्या.
३. घट्ट पिळून घेतलेल्या भाज्यांमध्ये किसलेलं आलं, मिरपूड,विनेगर, चिलीसॉस, सोया सॉस, अजिनोमोटो, साखर, मीठ, विनेगर, साधा भात आणि मैदा घाला. मिश्रण हाताने छान कालवून घ्या. मिश्रणाचे १ १/२" चे बॉल्स करून घ्या. गरज वाटल्यास आणखीन थोडा भात आणि अजून थोडासा मैदा घाला.
४. कढईत तेल गरम करा आणि मंचुरियन बॉल्स ब्राऊन रंगावर तळून घ्या. मगाशी बाजूला ठेवलेल्या व्हेजिटेबल स्टॉक मध्ये १ १/२ टेबलस्पून कॉर्नफ्लोर घालून गुठळ्या होऊ न देता ढवळून घ्या.
५. आता पातेल्यात २ टेबलस्पून तेल गरम करा. तेल तापले कि त्यात बारीक चिरलेलं आलं,बारीक चिरलेली लसूण घालून परता. लगेचच कांदा घालून परता.
६. नंतर हिरवी मिरची, भोपळी मिरची,कोबी घालून परता. विनेगर,सोयासॉस, चिली सॉस, साखर आणि अजिनोमोटो घालून परता. बारीक चिरलेली कांद्याची पात घाला.
७. व्हेजिटेबल स्टॉक आणि कॉर्नफ्लोरचे मिश्रण घालून ढवळा. मिश्रणाला उकळी येईल तसा मंचुरियन सॉस जाड व्हायला लागेल. सॉस सेमी ट्रान्सपरंट झाला याचा अर्थ सॉस तयार झाला. चव बघून मीठ घाला.त्यात मंचुरियन बॉल्स घालून व्हेज मंचुरियन राइस किंवा नुडलस बरोबर सर्व्ह करा.

टीप: मंचुरियन बॉल्स घातल्यावर मंचुरियन ग्रेविमध्ये बॉल्स १/२-१ तास मुरु द्यावे. म्हणजे खाताना जास्ती मजा येईल.
ड्राय मंचुरियन करायचे असेल तर व्हेजिटेबल स्टॉक आणि कॉर्न फ्लोर घालायच्या आधीच्या स्टेप पर्यंत (no . ६) सॉस बनवून त्यात बॉल्स मिक्स करा.

चवळीची उसळ-Chavlichi Usal


Read this recipe in English
सर्व्हिंग: ३ ते ४ माणसांसाठी 

साहित्य:
१ कप चवळी
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून गरम मसाला
१/२ टीस्पून हळद
१/२ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
२ टेबलस्पून कोथिंबीर
१ चिमुट आमचूर
१/४ टीस्पून साखर
मीठ चवीप्रमाणे 


कृती: 
१. चवळी ८-१० तास पाण्यात भिजत घाला.नंतर भिजवलेली चवळी कुकरमध्ये दीड पट पाणी आणि १/४ टीस्पून मीठ घालून मऊसर शिजवून घ्या. कुकरच्या १ किंवा २ शिट्या करा. चवळी जास्ती शिजली कि त्याचा लगदा तयार होतो, त्यामुळे जास्ती शिट्ट्या करू नका.
२. कढईत तेल गरम करा. तेल तापले कि मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर हिंग घालून कांदा फोडणीला घाला. २-३ मिनिटे कांदा चांगला परतून घ्या.
३. हळद आणि लाल तिखट घालून परता. मग कुकरमध्ये शिजवलेली चवळी घालून परता. चवळी बरोबर उरलेले पाणी घाला.
४. आमचूर,गरम मसाला,कोथिंबीर आणि चवीपुरती थोडीशी साखर आणि मीठ घालून ढवळा. झाकण ठेवून उकळी काढा.
५. ५-७ मिनिटे उकळल्यावर गॅस बंद करा. वाफ मुरली कि जरावेळानी पोळी बरोबर सर्व्ह करा.

तवा भाजी-Tava bhaji

Read this recipe in English
सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी 

साहित्य:
१ कप कांद्याचे चौकोनी तुकडे
१/२ कप बटाट्याचे चौकोनी तुकडे
फ्लॉवरचे ५-६ तुरे
१/२ कप भोपळी मिरचीचे चौकोनी तुकडे
१/२ कप गाजराचे चौकोनी तुकडे
१/४ कप मटार
१/२ कप पनीरचे चौकोनी तुकडे
४-५ लसूण पाकळ्या चिरून
मॅरीनेट  करण्यासाठी मसाला-
१ टीस्पून जिरेपूड
१ टीस्पून धणेपूड
१ १/४ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हळद
१/४ टीस्पून आमचूर
मीठ
४ टेबलस्पून तेल 

कृती:
१. साहित्यात दिलेला सगळा मसाला आणि मीठ  एका वाटीत एकत्र करून घ्या. हा सगळा मसाला भाज्यांना लावून १०-१५ मिनिटे मॅरीनेट करून ठेवा.
२. खोलगट तव्यावर तेल गरम करून लसूण फोडणीला घाला. लसूण गुलाबी झाली कि कांदा फोडणीला घालून १-२ मिनिटे परतून घ्या.
३. नंतर बटाटा परता. मग उरलेल्या सगळ्या भाज्या आणि पनीर घालून परता. हि भाजी मोठ्या आचेवर (high  flame) करावी.
४. ३-४ मिनिटे झाकण ठेवून भाज्या शिजू द्या. तळाला करपू नये म्हणून भाजी अधून मधून परतत रहा.तिखटपणा आणि मीठ चवीप्रमाणे वाढवावे.
५. हि भाजी पोळी किंवा पुलाव बरोबर सर्व्ह करा.

पुदिना पनीर टिक्का मसाला-Pudina Paneer Tikka Masala

Unique combination of Pudina and Paneer.
Read this recipe in English
सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी

साहित्य:
२०० ग्रॅम पनीर
भोपळी मिरचीचे ५-६ चौकोनी तुकडे
कांद्याचे ७-८ चौकोनी तुकडे
१ मध्यम कांदा उभा चिरून
१ जुडी पुदिना
१ कप कोथिंबीर
१/४ टीस्पून हळद
४-५ काजू 
१/४ टीस्पून आमचूर
२-३ लसूण पाकळ्या
३ हिरव्या मिरच्या
१/२" आले
३ टेबलस्पून घट्ट दही
१ टीस्पून बेसन
१/४ टीस्पून धणेपूड
१/४ टीस्पून जिरेपूड
१/४ टीस्पून चाट मसाला
१/४ टीस्पून गरम मसाला
मीठ चवीप्रमाणे
४-५ टेबलस्पून तेल
१ टेबलस्पून बटर

कृती:
१. पनीरचे चौकोनी तुकडे करून घ्या. आलं ,लसूण आणि हिरवी मिरची बारीक वाटून पेस्ट करून घ्या. पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर मिक्सरवर बारीक वाटून ठेवा.
२. ३ टेबलस्पून दह्यात, १ चिमुट हळद, १ टीस्पून बेसन,१/४ टीस्पून धने-जिरेपूड,१/२ टीस्पून आलं-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट,१ चिमुट गरम मसाला आणि मीठ घालून चमच्याने घोटून घ्या.
३. 300°F तापमानाला ओव्हन preheat करून घ्या. मिश्रणात पनीरचे तुकडे घोळवून बेकिंग ट्रे मध्ये अरेंज करा. पनीर वरून चमच्याने थोडे बटर पात्तळ करून सोडा आणि एकूण १५-२० मिनिटे ग्रील करा. १० मिनिटांनी पनीर उलटवा आणि आणखीन ५-७ मिनिटे ओव्हन मध्ये ठेवा. पनीरला लाईट ब्राऊन रंग आला म्हणजे ते ग्रील झाले असे समजावे. ओव्हन नसेल तर पनीरचे तुकडे थोड्याश्या तेलात (मॅरीनेट न करता नुसतेच) शालो फ्राय करा. मॅरीनेट करायचा बाकीचा मसाला ग्रेवी करताना त्यातच घाला.
४. पातेल्यात २ टेबलस्पून तेल गरम करा त्यात काजू तळुन घ्या. उरलेल्या तेलात उभा चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यात उरलेली आलं- लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट आणि हळद घालून परता. ३-४ मिनिटे परतल्यावर ,सगळे मिश्रण आणि तळलेले काजू मिक्सर मधून काढून बारीक पेस्ट करून घ्या.
५. पातेल्यात २ टेबलस्पून तेल गरम करा. त्यात कांद्याचे वाटण , भोपळी मिरची आणि कांद्याचे तुकडे घालून परता. झाकण ठेवून भोपळी मिरची शिजवा. नंतर पुदिना-कोथिंबीरीचे वाटण घालून परता. १/४ टीस्पून गरम मसाला, आमचूर ,मीठ घाला.२-३ मिनिटे परतून अर्धा कप पाणी घाला.एक उकळी काढा. ग्रील केलेले पनीरचे तुकडे घालून अलगद परता आणि गॅस लगेच बंद करा. झाकण ठेवा. वाफ २-३ मिनिटे मुरु द्या.
६. पराठा, नान किंवा राईस बरोबर सर्व्ह करा.

पालकाची पात्तळ भाजी-Dal Palak

Read this recipe in English
सर्व्हिंग: ४ माणसांसाठी 

साहित्य:
१ जुडी पालक
१/२ कप तुरीची डाळ
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
५-६ लसूण पाकळ्या चिरून
१ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हळद 
१/४ टीस्पून आमचूर
१/२ टीस्पून धनेपूड    
१/२ टीस्पून  जिरेपूड  
मीठ, साखर चवीप्रमाणे
२ टेबलस्पून तेल

कृती:
१. कुकरमध्ये  पाणी घालून डाळ शिजवून घ्या. कुकर थंड झाला कि डाळ घोटून घ्या. पालक बारीक चिरून ठेवा.
२. पातेल्यात तेल गरम करा. लसूण फोडणीला घाला. कांदा परतून घ्या.
३. २-३ मिनिटे कांदा परता मग त्यात हळद, लाल तिखट ,धने-जिरेपूड घालून परता.
४. घोटलेली डाळ घाला. मीठ, साखर आणि आमचूर घालून ढवळा.
५.  डाळ खूप जाड असेल तर थोडेसे पाणी घालून पात्तळ करा.
३-४ मिनिटे उकळत ठेवा.
६. चिरलेला पालक घालून ढवळा. २-३ मिनिटे उकळा.
७. गरम गरम डाल पालक भातावर किंवा पोळी बरोबर सर्व्ह करा.

टीप : आमचूर नसेल तर टोमॅटो  किंवा चिंच घातली तरी चालेल. पालक कुकरमध्ये डाळीबरोबर शिजवल्यास किंवा सर्वात आधी घातल्यास पालकाचा हिरवा रंग बदलतो आणि त्यातली जीवनसत्त्वं  कमी होतात. डाळ-पालक जेवायच्या खूप आधी करून ठेवले तर न झाकता तसेच ठेवा. म्हणजे पालकाचा रंग बदलणार नाही.

कुळथाचं पीठलं / पिठी- Kulthachi Pithi

Read this recipe in English
सर्व्हिंग: २ माणसांसाठी

साहित्य:
४ टेबलस्पून कुळथाचं पीठ 
१ १/२ कप पाणी
१/४ कप बारीक चिरलेला कांदा 
५-६ लसूण पाकळ्या ठेचून/ चिरून 
४ टेबलस्पून ओलं खोबरं
१ १/२ टीस्पून चिंचेचा कोळ
१/२ टीस्पून लाल तिखट    
मीठ चवीप्रमाणे
३ टेबलस्पून तेल 

कृती:
१. एका बाउल मध्ये कुळथाचं पीठ, चिंचेचा कोळ, लाल तिखट,मीठ पाण्यात घाला. हाताने कालवून  एकजीव करा.
२. कढईत तेल गरम करा. लसूण फोडणीला घाला. लसूण गुलाबी झाली कि कांदा घालून परता.
३. २-३ मिनिटांनी बाउल मधले मिश्रण घाला. उकळी आल्यावर मिश्रण जाड होऊ लागेल.
४. ओलं खोबरं घालून ढवळा. झाकण ठेवून १ वाफ काढा आणि भातावर किंवा पोळी बरोबर सर्व्ह करा.

कोबीची भाजी-Cabbage Chana Dal Subji

Read this recipe in English
सर्व्हिंग : ४ माणसांसाठी 
साहित्य:
१ मध्यम कोबी
१/४ कप भिजवलेली चणा डाळ (चणा डाळ आधीच २ तास पाण्यात भिजवून ठेवा.)
१/२ टीस्पून हळद 
२ हिरव्या मिरच्या
१/२ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
१ टेबलस्पून कोथिंबीर
२ टेबलस्पून ओलं खोबरं 
मीठ चवीप्रमाणे 

कृती:
१. कोबी बारीक चिरून घ्या. कढईत तेल गरम करा आणि मोहरी घाला. मोहरी तडतडली कि, हिरवी मिरची तुकडे करून घाला.हळद  आणि हिंग घाला.
२. लगेच चण्याची डाळ आणि कोबी फोडणीला घाला. मीठ घालून परता.
३. ३-४ मिनिटे झाकण ठेवून कोबी वाफवून घ्या. कोबी एकदम मऊ होईल इतका शिजवू नका.
४. वरून कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून भाजी सर्व्ह करा.

बटाट्याची भाजी-batatyachi bhaji

Read this recipe in English
सर्व्हिंग : २ ते 3 माणसांसाठी 
साहित्य:
२ ते ३ मध्यम उकडलेले बटाटे 
१ १/२ कप बारीक चिरलेला कांदा 
१/२ टीस्पून मोहरी
१ टीस्पून उडदाची डाळ 
१/२ टीस्पून हळद
२ सुक्या मिरच्या 
१/४ टीस्पून हिंग
३ टेबलस्पून सुकं खोबरं
२ टीस्पून लिंबुरस
५-६ कढीपत्ता पाने
२ टेबलस्पून कोथिंबीर
१ १/२  टीस्पून साखर
मीठ चवीप्रमाणे
४ टेबलस्पून तेल

कृती:
१. बटाट्याच्या लहान फोडी करा. कढईत तेल गरम करा आणि मोहरी घाला. मोहरी तडतडली कि, मिरच्यांचे २ तुकडे करून घाला.कढीपत्ता,उडदाची डाळ घाला.उडदाची डाळ गुलाबी झाली कि,हळद आणि हिंग घाला.
२. बारीक चिरलेला कांदा फोडणीला घाला आणि २ ते ३ मिनिटे परतून घ्या. मग बटाट्याच्या फोडी घालून परता. मीठ- साखर  घालून मिक्स करा.
३. खोबरं आणि लिंबूरस मिक्स करून १ वाफ काढा. कोथिंबीर पेरून सर्व्ह करा.

वांग्याचं दह्यातलं भरीत-Vangyacha Dahyatla Bharit


सर्व्हिंग: ४ माणसांसाठी

साहित्य: 
१ मध्यम भरताचं वांगं
३/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/२ कप दही
१/२ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
१-२ हिरव्या मिरच्या
१ टेबलस्पून  कोथिंबीर
मीठ आणि साखर चवीप्रमाणे

कृती:
१. भरताचं वांगं प्रीहीटेड ओव्हन मध्ये किंवा गॅस वर त्याला सुरकुत्या पडे पर्यंत (अंदाजे ३० मिनिटे) भाजून घ्या. ५-५ मिनिटांनी गोल फिरवत राहा म्हणजे सगळ्या बाजूने भाजलं जाईल आणि त्याची साल निघून येईल.गॅस वर भाजले तर सालीचे तुकडे थोडे थोडे निघून येतात.
वांगं पूर्ण भाजलं गेलं आहे याची काटा चमच्याने टोचून खात्री करून घ्या.
२. वांगं थंड झालं कि साल काढून हाताने कुस्करून घ्या.
३. त्यातच कांदा, दही, मीठ, साखर आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.
४. फोडणीच्या कढईत तेल गरम करा आणि मोहरी घाला. मोहरी तडतडली कि हिरवी मिरची तुकडे करून घाला. मिरची पांढरी झाली कि कढीपत्ता पाने आणि शेवटी हिंग घालून भरताला वरून फोडणी द्या.
५. हे भरीत भाकरी किंवा पोळी बरोबर साईड डिश म्हणून सर्व्ह करा.

मटर मशरुम- Mutter Mushroom

सर्व्हिंग : ४ माणसांसाठी

साहित्य: 
१०-१२ बटन मशरुम
१/२ कप मटार
१ कप उभा चिरलेला कांदा
१/४ कप कांदा बारीक चिरलेला
१ मध्यम टोमॅटो
१ टीस्पून लाल तिखट
१ /२ टीस्पून हळद
१ टेबलस्पून बारीक चिरलेली लसूण
३ टेबलस्पून तेल

कृती:
१. एका मशरूमचे ४ ते ६ तुकडे (स्लाइस) याप्रमाणे सगळे मशरुम कापून ठेवा. कढईत तेल गरम करा. तेलात लसूण फोडणीला घाला. लसूण गुलाबी झाली कि बारीक चिरलेला कांदा परतून घ्या. हळद तिखट घालून परता.
२. उभा कांदा घालून २-३ मिनिटे परता. टोमॅटोच्या साधारण १" आकाराच्या फोडी करून घाला आणि तेल सुटे पर्यंत परता.
४. तेल सुटल्यावर मटार आणि मशरूम घालून परता. ३-४ मिनिटे झाकण ठेवून मटार चांगले शिजवा.
५. मीठ घालून एक वाफ काढा आणि रोटी किंवा नान बरोबर सर्व्ह करा.

पिठलं-Pithla

Read this recipe in marathi
सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी

साहित्य: 
१/२ कप बेसन
१ १/२ कप पाणी
१ कप कांदा बारीक चिरलेला
२ हिरव्या मिरच्या
१ /२ टीस्पून जिरे
४-५ लसूण पाकळ्या
१/२ टीस्पून हळद
३ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून
३ टेबलस्पून तेल

कृती:
१. कढईत तेल गरम करा. तेलात जिरे फोडणीला घाला.जि-याचा वास आला कि हिरवी मिरची तुकडे करून आणि लसूण फोडणीला घाला. लसूण गुलाबी झाली कि कांदा परतून घ्या. हळद घालून परता.
२. एका बाउल मध्ये बेसन आणि पाणी गुठळ्या होऊ न देता मिक्स करून घ्या.त्यातच अंदाजे मीठ घाला.
४. कांदा परतून झाला कि, बेसन मिक्स केलेलं मिश्रण घालून ढवळा. उकळी आल्यावर पिठलं जाडसर व्हायला लागेल झाकण ठेवून १-२ मिनिटे शिजू द्या.
५. जास्ती जाड झालं तर आवडीप्रमाणे पिठलं पात्तळ करायला पाणी घाला. गरम गरम पिठलं, भाकरी बरोबर सर्व्ह करा.

मटकीची उसळ-Matkichi Usal

सर्व्हिंग: ४ माणसांसाठी

साहित्य: 
२ कप मोड आलेली मटकी
१ कप बारीक चिरलेला कांदा
५-६ लसूण पाकळ्या चिरून
१/४ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून गोडा मसाला
२ टीस्पून चिंचेचा कोळ
३ टेबलस्पून ओलं खोबरं
१ टेबलस्पून कोथिंबीर चिरून
मीठ चवीप्रमाणे
२ टेबलस्पून तेल

कृती: 

१. कढईत तेल गरम करा आणि लसूण फोडणीला घाला. लसूण गुलाबी झाली कि २ ते ३ मिनिटे कांदा परतून घ्या.
२. हळद तिखट घालून परता आणि मटकी फोडणीला घाला. १ १/२ कप पाणी घाला. झाकण ठेवून मटकी शिजवा. अधून मधून ढवळत रहा.
३. मटकी शिजली कि मीठ, गोड मसाला आणि चिंचेचा कोळ घाला. ओलं खोबरं घालून मिक्स करा. झाकण ठेवून १ वाफ काढा.
४. कोथिंबीर पेरून पोळी बरोबर सर्व्ह करा.

पनीरची भुर्जी-Paneer Burji

Read this recipe in English
सर्व्हिंग: ४ माणसांसाठी

साहित्य:
२०० ग्रॅम पनीर
१ कप बारीक चिरलेला कांदा
१ टोमॅटो
१/४ टीस्पून हळद
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
१/२ टीस्पून जिरे
१ टीस्पून बारीक चिरलेली लसूण
१ टीस्पून बारीक चिरलेलं आलं  
१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१/४ टीस्पून चाट मसाला
मीठ चवीप्रमाणे
२ टेबलस्पून तेल

कृती:
१. पनीर हाताने कुस्करून बारीक चुरा करून घ्या.
२. पातेल्यात तेल गरम करा आणि तेलात जिरे फोडणीला घाला. जि-याचा खमंग वास आला कि कांदा, हिरवी मिरची, आलं,लसूण घालून २-३ मिनिटे परता. कांदा गुलाबीसर झाला कि हळद आणि टोमॅटो (बारीक चिरून) घालून तेल सुटेपर्यंत परता.
३. नंतर पनीर घालून १-२ मिनिटे परता.पनीर गरम झाल्यावर वितळते.त्यामुळे जास्ती वेळ परतू नका.पनीर एकजीव होऊन लगदा होऊ देऊ नका. काटा चमच्याने मध्ये मध्ये परता.शेवटी चाट मसाला आणि मीठ घालून परता आणि १ वाफ काढा. कोथिंबीर पेरून सर्व्ह करा.

मटारचा हिरवा रस्सा-Mutter Rassa

Read this recipe in English
सर्व्हिंग: ४ माणसांसाठी

साहित्य:
१ १/२  कप मटार
१ कप बारीक चिरलेला कांदा
१ छोटा बटाटा ( मध्यम आकाराच्या फोडी करून पाण्यात ठेवा.)
१/४ टीस्पून हळद
२ टेबलस्पून तेल 
वाटणासाठी-
१ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
२ हिरव्या मिरच्या
१/२ टीस्पून धने
१/२ टीस्पून जिरे
१/२ टोमॅटो
३ टेबलस्पून ओलं खोबरं
खडा मसाला (१ लवंग,३ मिरी, १" दालचिनी )
मीठ चवीप्रमाणे

कृती:
१. मिक्सरमध्ये कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, खडा मसाला, टोमॅटो, धने, जिरे आणि ओलं खोबरं, पाणी घालून बारीक वाटून घ्या.
२. पातेल्यात तेल गरम करा आणि तेलावर कांदा परतून घ्या. कांदा गुलाबीसर झाला कि हळद आणि बटाट्याच्या फोडी घालून परता. बटाटा शिजला कि,वाटलेला मसाला घालून परता.
३. नंतर मटार घालून परता. मीठ घाला. आवडीप्रमाणे रस्सा पात्तळ करायला पाणी घाला आणि झाकण ठेवून मटार शिजेपर्यंत उकळत ठेवा.
४. मटार रेडी मेड फ्रोझन असतील तर पटकन शिजतात त्यामुळे १ उकळी काढून सर्व्ह करा.

मटर पनीर-Mutter Paneer




सर्व्हिंग: २  माणसांसाठी
साहित्य:
१/२ कप वाफवलेले मटार
५० ग्रॅम पनीर
१ १/२ कप बारीक चिरलेला कांदा
२ टोमॅटो बारीक चिरून
४-५ काजू
१ १/२ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हळद
१/४ टीस्पून गरम मसाला
१/४ टीस्पून धनेपूड
१/४ टीस्पून जिरेपूड
१ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
३ टेबलस्पून तेल
मीठ चवीप्रमाणे


कृती:

१.पनीरचे चौकोनी तुकडे करून तेलावर गोल्डन ब्राऊन रंगावर जेमतेम शालो फ्राय करून घ्या.म्हणजे पनीर ग्रेवीत घातल्यावर मोडणार नाही. डीप फ्राय करू नका त्यामुळे पनीर मधले प्रोटीन्स कमी होतात.
२. पातेल्यात तेल गरम करा आणि त्यात काजू तळून घ्या. काजू बाजूला काढून ठेवा आणि त्या तेलात आलं-लसूण पेस्ट घालून काही सेकंद परता मग कांदा फोडणीला घाला. कांदा गोल्डन ब्राऊन झाला कि टोमॅटो, हळद ,तिखट घालून तेल सुटे पर्यंत परता. मिश्रण थंड झालं कि काजू घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
३. पातेल्यात १ टेबलस्पून तेल गरम करा आणि मिक्सर मधले वाटण तेलावर परतून घ्या. त्यात धने-जिरे पूड, गरम मसाला घाला. वाफवलेले मटार आणि १/२ कप पाणी घालून उकळी काढा.
४. शालो फ्राय केलेले पनीर घालून अलगद ढवळा. झाकण ठेवू १ वाफ काढा. आणि कोथिंबीर पेरून नान किंवा रोटी बरोबर सर्व्ह करा.