साहित्य:
१५-१६ कोलंब्या (खूप मोठ्या असतील तर १०-१२ पुरतील)
१ १/२ कप बासमती तांदूळ
१ कप बारीक चिरलेला कांदा
१ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
२ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१/२ टीस्पून धनेपूड
१/२ टीस्पून जिरेपूड
१/२ टीस्पून साखर
२ टेबलस्पून कोथिंबीर
मीठ चवीप्रमाणे
४ टेबलस्पून तेल
कृती:
१. कोलंबीचा धागा आणि कवच काढून साफ करून घ्या. तांदूळ धुवून ठेवा.
२. पातेल्यात तेल गरम करा. आलं-लसूण पेस्ट फोडणीला घाला. खमंग वास आला कि कांदा परतून घ्या.
३. २-३ मिनिटे कांदा परता मग त्यात हळद, लाल तिखट ,धने-जिरेपूड घालून परता.
४. कोलंबी आणि मीठ घालून परता. झाकण ठेवून १ वाफ आणा.
५. तांदूळ घालून ३-४ मिनिटे परता. तांदूळ सुटसुटीत झाला कि तांदुळाच्या बरोबर दुप्पट गरम पाणी घाला. चव बघून लागल्यास मीठ घाला.
६. वरून घट्ट झाकण ठेवून मध्यम आचेवर भात शिजवा. भात झाल्यावर झाकण काढून भात गार होऊ द्या. काटा चमच्याने भात वर खाली करा म्हणजे शीत मोडणार नाही.
७. असे केल्याने भात छान मोकळा होईल. सर्व्ह करायच्या वेळेस बारीक आचेवर ठेवून एक वाफ आणा आणि कोथिंबीर पेरून सर्व्ह करा.
टीप : तेल कमी पडले तरी भात गिच्च होतो. तांदूळ खूप परतून घ्या म्हणजे भात छान मोकळा होईल.
कोलंबी खूप लहान असेल तर कधी कधी जास्ती शिजली जाते त्यामुळे कांदा आणि मसाले घालून कोलंबी वेगळी परतून घ्या. आणि मीठ घालून भात वेगळा शिजवून घ्या. भात झाल्यावर एकत्र करून १ वाफ आणा.